भाजप तालुकाध्यक्षाची गुंडागर्दी, बीडीओला घरात घुसून केली मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । परभणी

परभणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला (बीडीओ) भाजपच्या तालुकाध्यक्षाने घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सी. एम. ढोकणे असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. भाजपचे परभणी तालुकाध्यक्ष राजेश देशमुख यांनी आपल्या मारहाण केल्याचा आरोप ढोकणे यांनी केला आहे. या प्रकरणी राजेश देशमुख यांच्या विरूद्ध ढोकणे यांनी परभणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

‘पाणी पुरवठा समितीच्या बैठकीला आम्हाला का बोलवले नाही’ असा जाब विचारत देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह घरात घुसून आपल्याला मारहाण केली. तसेच दारापर्यंत ओढत नेऊन धमकावल्याचेही ढोकणे यांनी सांगितले आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास परभणी रेल्वे स्टेशन रोड परिसरातील ढोकणे यांच्या शासकीय निवासात ही घटना घडली. मात्र राजेश देशमुख यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन करत ढोकणे यांच्यावरच आरोप केले आहेत. ‘ढोकणे हे सर्वांना आपल्या घरी बोलवून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरातच सगळे पेपर काळे केले जातात’, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण ढोकणे यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला घरी बोलावले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही आमची कामे होत नसल्याने बाचाबाची झाली. पण आपण मारहाण केली नसल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे. या प्रकरणी परभणी पोलीस अधिक तपास करत आहेत.