भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अनिल गोटे यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कायम खोटे बोलत राहिले म्हणून मी भाजप सोडून आज राष्ट्रवादीत आलो. देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांची फसवणूक केलीच, पण त्यांनी सर्वांचीच फसवणूक केली. इतका कपटी माणूस आतापर्यंत पाहिला नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात एक डझन आमदार माझ्यासोबत असतील असा दावा गोटे यांनी केला.

अनिल गोटे यांनी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीआधी एप्रिल महिन्यात अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासूनच त्यांचा भाजपमधील नेत्यांसोबत संघर्ष सुरू झाला.