राणे यांची अटक योग्यच, महाडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक योग्य होती, अशा शब्दांत महाडचे न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी मंगळवारी राणेंच्या वकिलांना सुनावले. एवढेच नव्हे, तर अटक करण्यासाठी वॉरंट किंवा नोटीस दिली नव्हती हा त्यांचा दावाही दंडाधिकाऱयांनी धुडकावून लावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले आणि महाडच्या न्यायदंडाधिकाऱयांसमोर उभे केले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर राणे यांची जामिनावर मुक्तता झाली. आज दंडाधिकाऱयांच्या आदेशाची प्रत पत्रकारांना मिळाली.

अटकेसाठी नोटीसची गरज नाही

आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी जे कारण दिले आहे ते पाहता अटकेची कारवाई योग्यच आहे, असे न्यायदंडाधिकाऱयांनी स्पष्ट म्हटले आहे. मात्र चौकशीसाठी कोठडीची गरज वाटत नसल्यानेच जामीन मंजूर करत असल्याचेही कोर्टाने म्हटले. राणेंचे वकील ऍड. राजेंद्र शिरोडकर यांनी कलम 41 अ अन्वये राणे यांना अटक करण्यापूर्वी त्यांना वॉरंट किंवा नोटीस द्यायला हवी होती याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले असता न्यायदंडाधिकारी पाटील यांनी हा मुद्दाच फेटाळून लावला. 41 अ अन्वये पोलीस अधिकारी कुणालाही वॉरंट किंवा नोटीसशिवाय अटक करू शकतो, असे दंडाधिकाऱयांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

न्यायालयाने काय म्हटले आहे?

नारायण राणे यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देत आहे.

आरोपीने 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर या दोन दिवशी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी द्यावी.

या प्रकरणातील कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांना धमकावण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न आरोपीने करू नये.

जर तपास अधिकाऱयांना आरोपीच्या आवाजाचे नमुने लागले तर आरोपीने सहकार्य करावे. पोलिसांनी मात्र त्यासाठी सात दिवस अगोदर आरोपीला लेखी सूचना द्यावी. आरोपीने भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करू नये.

…तरीही राणे म्हणतात, अटक झालीच नाही

मला अटक करण्यात आली नाही. पोलिसांच्या विनंतीनुसार स्वतःच्या गाडीने कोर्टात गेलो होतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. तिथून संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले. यानंतर रात्री त्यांना महाड येथे कोर्टात आणण्यात आले. मात्र यावर बोलताना नारायण राणे यांनी आपल्याला अटक केली नसून पोलिसांच्या विनंतीनुसार कोर्टात गेलो होतो, असा खुलासा आज केला. नारायण राणे यांनी सांगितले की, मला अटक करण्यात आली नाही. पोलिसांच्या विनंतीनुसार स्वतःच्या गाडीने कोर्टात गेलो होतो. गाडीत बसल्यावर अटक झाली नव्हती. पोलिसांनी कोर्टात हजर करायचे आहे, असे सांगण्यात आले होते. कोर्टात जाईपर्यंत मला अटक करण्यात आली नव्हती, असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.

हम नही सुधरेंगे

बेताल आणि आक्षेपार्ह बडबडीमुळे अडचणीत आलेले नारायण राणे मात्र ‘असेच’ बोलत राहणार यावर ठाम आहेत. महाड कोर्टात आणि उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान हे उघड झाले. भविष्यात राणे यांनी जाहीरपणे अशी विधाने करू नयेत, असे ऍड. राजेंद्र शिरोडकर यांनी महाड कोर्टात सांगितले होते. मात्र यामुळे आपल्या भाषण स्वातंत्र्यावर गदा येईल असे राणे म्हणाल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. आज उच्च न्यायालयानेही याबाबत विचारणा केली असता राणे ‘भाषण स्वातंत्र्यावर’ ठाम राहिले.