पावसाळ्यातल्या खड्ड्यांची यंदा चिंता नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुढच्या वर्षीच्या पावसाळय़ात मुंबईकरांना खड्डय़ांचा त्रास सोसावा लागू नये म्हणून पालिकेने जानेवारी महिन्यापासूनच कामाला लागायचे ठरवले आहे. खड्डे बुजवण्यासाठीच्या कोल्डमिक्सचे उत्पादन जानेवारी महिन्यापासूनच सुरू करण्याचे रस्ते विभागाने ठरवले आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळय़ात खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने खास जर्मनीहून कोल्डमिक्स बनवण्याचे तंत्रज्ञान आणले होते. पालिकेच्या वरळीच्या प्लाण्टमध्ये त्याकरिता खास बदल करण्यात आले होते. पावसातही टिकणारे कोल्डमिक्स पालिकेने स्वतः बनवायला सुरुवात केली. पावसाळय़ादरम्यान या कोल्डमिक्सचे उत्पादन प्रशासनाने सुरू केले होते. मात्र त्याचा उत्पादनाचा वेग इतका कमी होता की दिवसाला फक्त पाच टन कोल्डमिक्स तयार होत होते. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवताना हे कोल्डमिक्स कमी पडू लागले. त्यामुळे अक्षरशः काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे तुकडे, दगड, विटा भरून खड्डे बुजवण्याची वेळ आली होती. खड्डय़ांवरून पालिकेला मोठय़ा प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते. नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते.

गेल्या वेळच्या वादातून धडा घेऊन पालिका प्रशासनाने यंदा कोल्डमिक्सचे उत्पादन लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी महिन्यापासूनच वरळीच्या प्लाण्टमध्ये उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. मान्सूनपूर्वीच कोल्डमिक्सचे पुरेसे उत्पादन घेऊन त्याचा साठा करून ठेवण्यात येणार आहे.

खड्डय़ांचे प्रमाण कमी होणार?
शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या स्थितीचा अंदाज घेऊन पुढील पावसाळय़ात किती कोल्डमिक्स लागेल याचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रस्त्यांची कामे अधिक झालेली असल्यामुळे बहुतांशी रस्ते हमी कालावधीत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे कमी पडतील, असा विश्वास अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

– खड्डय़ांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पालिकेने अनेक प्रयोग केले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेतर्फे हॉटमिक्सचा वापर केला जात होता. मात्र सगळे पर्याय फेल जात होते.
– पालिकेने ऑस्ट्रियाचे ‘मिडास टच’ आणि इस्रायलचे ‘स्मार्ट फिल’ हे कोल्डमिक्स मटेरियल गेल्या वर्षी वापरले होते. अतिशय चांगले व भरपावसातही खड्डे बुजवणारे हे मटेरियल 130 रुपये किलो दराने पालिकेने विकत घेतले होते.
– गेल्या वर्षी पालिकेने एका जर्मन कंपनीला कंत्राट दिले. ही कंपनी वरळी येथील कारखान्यातील यंत्रसामग्री अद्ययावत करून पुढील पाच वर्षे पावसाळय़ात प्रत्येकी 150 टन व पावसाळय़ानंतर 60 टन मिश्रणाचा पुरवठा करणार आहे.