
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे सन 2006 ते 2021 पर्यंत असणारी संचालक मंडळे, मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांना मदत करणारे अधिकारी, कर्मचारी आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचा अहवाल नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना सादर केला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील चेअरमन, संचालक, मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांनी बँकेत नियमबाह्य कामकाज करून बँकेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यासह सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिंह कळमकर यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तत्काळ नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार शाह यांनी व त्यांच्या पथकाने तपासणी केली असता सन 2006 ते 2021 कालावधीतील संचालक मंडळ दोषी आढळले आहे.
बँकेच्या अधिकाऱयांनी कर्ज वसूल करताना नियमबाह्य ओटीएस सवलत देणे, अपारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवणे, अयोग्य दराने सरचार्ज आकारणे, न्यायालयीन खर्चासाठी अवाढव्य वकील फी बँकेत टाकणे, म्युच्युअल फंडात बेकायदेशीर गुंतवणूक करत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करणे, शासकीय रकमेचा अपहार करणाऱया कर्जत शाखाधिकारी सदाशिव फरांडे याला निलंबित न करता पाठीशी घातल्याचा ठपका संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे. या अहवालात मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी नियमबाह्य कामकाज केले आहे, तर संचालक मंडळाने कर्तव्यात हेतूपूर्वक कसूर, निष्काळजीपणा करत कोटय़वधी रुपयांचे बँकेचे नुकसान केले आहे. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्यासह शाखा व्यवस्थापकानांही लेखापरीक्षण अहवालात दोषी ठरवण्यात आले आहे.

























































