पुलंचं न संपणारं गणगोत

123

>> डॉ. विजया वाड

‘गणगोत’. मुळच्याच ठाशीव व्यक्तिमत्त्वांना जेव्हा पुलंचा परीसस्पर्श लाभला तेव्हा प्रत्येक व्यक्तीमत्त्व पुन्हा झळाळून निघालं.

पु.ल. देशपांडे हे वाचकांचे लाडके लेखक. ‘त्यांच्या ‘गणगोत’ या पुस्तकावर आज मला आपणा सर्वांशी बोलावंसं वाटतंय. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक रंगी माणसे भेटतात. कधी स्नेह जुळतो नि रेशीमगाठी पक्क्या होतात, कधी स्नेहाचे धागे सहजपणे विरून जातात, पण रिकाम्या वेळी माणसे आठवत राहतात. अगदी ‘गरज’ म्हणून जवळ आलेले लोक गरज सरताच कसे अनोळखी होतात त्याचा सल मनात शिल्लक राहतो नि मग आपण ताकसुद्धा फुंकून पितो. काही माणसे अशी विलक्षण असतात की, उपकारांचे ओझे ठेवून कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्यातून बाजूला होतात. याच माणसांची जिवंत शब्दचित्रे म्हणजे ‘गणगोत’ हे पुस्तक. पुल म्हणतात, ‘‘माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे ‘गणगोत’ फार मोठे आहे.’’ अनिलांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘इथे सखे नि सोबती, कुणी इथे कुणी तिथे’’. पुढे ते मनमोकळे करताना म्हणतात, ‘‘पुढल्या शे-दोनशे पानांतून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळय़ांनी पाहताना त्यांचे जे दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी.’’

या पुस्तकात एकूण 16 मंडळी आपणांस पुलंच्या लेखणीतून भेटतात. ‘ऋग्वेदी’ या आपल्या पहिल्या लेखात आपल्या आजोबांचे शब्दचित्र रेखाटताना पुल पार्ल्याचा आरसा वाचकांच्या नजरेसमोर धरतात. ‘‘पार्ल्यात गेल्यावर ‘‘आयलो रे पुता?’’ ही हाक ऐकू येणार नाही आता.’’ हे वाचताना वाचकाचे मन तुटते. मुंबई शहराच्या अगदी जवळ असून त्या काळी पार्ल्यावर कोकणी साधेपणाची छाप होती. ‘आताची बकाल वस्ती पाहिली की, ‘‘हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली’’ असे शब्द ओठी येतात’ असे पुलं लिहून जातात. आपल्या आजोबांसोबत त्यांचे परममित्र दादासाहेब पारधी नि चांदीवाले परांजपे यांचे वर्णनही लेखात येते.

दिनेश या दोन वर्षांच्या मुलाचे चित्रण ‘दिनेश’ या लेखात आहे. रात्री नाटय़ सेवा नि दिवसा रिकामे असलेल्या पुलंना शिशुवर्ग आपल्या जातीतला न समजेल तरच नवल. लेखकाच्या अंगाखांद्यावर दिनेश वाढला. ‘‘रिकामपण नि शरीराचे ऐसपैसपण मुंबईत शोधून सापडणार नाही’’, असे लेखक प्रामाणिकपणे म्हणतात. दिनेश पुलंच्या पाठीचा उपयोग मैदानासारखा करतो. हे पुलं किती सहज लिहून जातात. ‘चोभे’ साऱयांनाच नाटय़ वर्तुळात लागणारा माणूस. पाणी देतील, खिळे ठोकतील, वायरी जोडतील. ‘जो भी होगा बॅकस्टेज काम, उसपर चोभे का नाम’ पुल एक अत्यंत सुंदर भावना व्यक्त करतात. ‘‘आमच्या चोभेंसारखे अनेक चोभे प्रत्येक स्टुडिओत आहेत. त्यांच्या घामातून इतरांच्या यशाची आणि वैभवाची बेटे सजतात.’’ काय ष्टाईल आहे भावना व्यक्त करायची! आपण खरोखर नतमस्तक होतो हे असे शब्द वाचून.

केशवराव भोळे यांच्यावरील लेख नितांत सुंदर आहे. ‘प्रभात’ त्यांना का सोडावी लागली? त्या जागेची भाग्यरेखा का नि कशी पुसली गेली हे वाचताना जीव घुसमटतो. बळवंत मो. पुरंदरे यांचा ऐन नव्हाळीतला फोटो पाहून मन हरखून जाते. इतिहासकार आणि विक्षिप्तपणा या जोडगोळीबद्दलचे अनेक पदरी निवेदन फर्मास आहे. एक महत्त्वाचे वाक्य प्रत्येक मनुष्यमात्रासाठी या लेखात हाती लागते. पहा, ‘‘जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱयांना हे प्रयोजन सोळाव्या, सतराव्या वर्षीच गवसले. शिवचरित्र लिहिणे.’’

‘हिराबाई बडोदेकर’ हे व्यक्तिमत्त्व इतके सोज्वळ उतरले आहे की, एखादी सुरेल सुंदर खानदानी मैफल! पुल म्हणतात, ‘‘सच्चा सूर कुठल्याही सालात लागला तरी सच्चाच!’’ बायकांनी गाणे, मैफल रंगविणे हे जेव्हा ‘अब्रह्मण्यम’ समजले जायचे असा काळ हिराबाईंनी आपल्या खानदानी बैठकींनी गाजवला हे वाचून ऊर भरून येतो. सुरेशबाबूसारखे गुरू आणि भाऊ! गळय़ात आवाजाची जादू! एक लोकविलक्षण मोहिनी! ते म्हणतात, ‘‘हिराबाई आणि त्यांच्यातल्या चंपूताई मला तुळशीसारख्या पवित्र वाटतात.’’ मस्त ना रसिका?

मास्तर नसलेले फणसळकर मास्तर हे कुठल्याही शाळेत नोकरीला नव्हते तर मुंबईत एका गिरणीत नोकरीला होते. जी माणसे घरचे खाऊन गावच्या भाकऱया भाजत, त्यातले एक फणसळकर मास्तर. साक्षात उत्साहमूर्ती. पाचपन्नास पोरे जमायची त्यांच्याभवती, की मास्तर सुरू.
म्हणा, ‘‘मनोहरा मधुराच संस्कृत भाषा’’, की पोरं पाठोपाठ गजर करीत. व्याख्यान, प्रवचन, कीर्तन पार्ल्याच्या मंदिरात कोणाचेही असो, आभार मात्र मास्तरच मानणार. त्यांना वडील मंडळी ‘आभारे’च म्हणत. पार्ल्यातून एखादा ‘लोकमान्य’ मॅन्युफॅक्चर करायचे स्वप्न. इच्छाच अवाढव्य हो!
रामूभय्या दाते यांची देखणी रेखाकृती वाचकांना खूप आवडावी. लिंबासारखी कांती, बाकदार नाक, वेधक डोळे नि चेहऱयावर गर्भश्रीमंतीचे तेज. पुल लेखाच्या शेवटी लिहितात, ‘‘काहो? ‘तुझे आहे तुजपाशी’मधला काकाजी रामूभय्यावर बेतलाय का हो?’’ या प्रश्नाला मी उत्तरे देणे टाळतो. कारण होय म्हणणे म्हणजे दातेसाहेबांवर अन्याय आणि नाही म्हणणे म्हणजे अर्धसत्य.

‘बाय’ हा आजीवरचा लेख जिव्हाळा नि मायेने थबथबलेला आहे. आपल्या आजीचे शब्दचित्र. गोल बुंदी पाडणारी, खटय़ाळपणे बोलणारी आजी. सतत पाच-सहा वर्षे जडलेला आजार नि पाचवीला पुजलेले दारिद्रय़ तिने हसत आणि हसवीत उंबऱयाबाहेर ठेवले. दारिद्रय़ हसण्याला फार भिते. काय लिहून जातात लेखक पुल! ‘दया छाया घे’ हा नारायणराव राजहंसावरला लेख कवितेइतका सुरेख उतरला आहे. बालगंधर्व यांच्या स्वरांची मूर्तीच सोज्वळ ना! उत्कृष्ट लिहिलेले पीएल यांचे हे पुस्तक म्हणजे काळावरच्या पाऊलखुणा आहेत बरे रसिका!

गणगोत
लेखक – पु. ल. देशपांडे
प्रकाशक – मौज प्रकाशन
पृष्ठ – 202
मूल्य – शंभर रुपये
वर्ष – 2007

आपली प्रतिक्रिया द्या