कौटुंबिक वादातून दिराने वहिनीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यातील मुंढवा परिसरात उघडकीस आली आहे. कविता गदर असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिराला अटक केली आहे. मल्लिकार्जुन गदर असे अटक आरोपीचे नाव आहे.
मुंढवा परिसरातील साईबाबा कॉलनी येथे गदर कुटुंब राहत होते. 14 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास साडेतीनच्या सुमारास मयत कविता आणि तिचा दीर मल्लिकार्जुन यांच्यात भांडण झाले. यानंतर मल्लिकार्जुनने गळा आवळून कविताची हत्या केली.
पोलिसांनी प्रथम अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र पीडितेच्या सात वर्षाच्या मुलीने हत्येच्या काही तास आई आणि काकामध्ये भांडण झाल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच शवविच्छेदन अहवालामध्येही हत्येची पुष्टी करण्यात आली. यावरुन पोलिसांनी आरोपी मल्लिकार्जुनला अटक केली.
आरोपीला दारुचे व्यसन होते. यावरुन दीर आणि वहिनीमध्ये रोज भांडण व्हायचे. याच भांडणातून आरोपीने वहिनीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.