
बुधवारी सकाळी जे. जे. उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर काही क्षणातच ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांनी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बसबाहेर काढून जखमींना जी.टी. रुग्णालयात दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि बेस्ट प्रशासनाने या जिगरबाज कर्मचाऱयांचे कौतुक करीत सत्कार केला आहे.
बेस्टच्या पाठकवाडी येथील कामगार रात्रपाळीचे काम करून बुधवार, 26 जून रोजी सकाळी 6.45 वाजता जे. जे. उड्डाणपुलावरून परत येत होते. यावेळी अंजुमन इस्लाम हायस्कूलची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना संरक्षक भिंतीला आदळून मोठा अपघात झाला. यावेळी सुदैवाने बसच्या मागून येणाऱया बेस्टच्या विद्युत जोडणी विभागाच्या कर्मचाऱयांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. यामध्ये बसमधील जखमी नऊ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती अधिकारी नवघरे आणि विभागीय अभियंता नारखेडे यांना कळवली. ‘बेस्ट’ कर्मचारी जोडारी सदू खतेली, जोडारी जोडीदार प्रलेश चायनाखवा, नवघाणी सतीश गवळी, वाहनचालक प्रदीप भोंडवे, नैमित्तिक कामगार सूर्यकांत सुर्वे, संदीप सुर्वे, आनंदा मेदार यांच्या कामगिरीबद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी यांनी पाठकवाडी येथे जाऊन सर्व कर्मचाऱयांचा सत्कार केला. यावेळी बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे, मिलिंद हळदणकर, अधिकारी शिवदास फुलपगारे, अजय सावंत, पैलाश डाबेराव, अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, कुलाबा आगार येथील मुख्यालयात विद्युत पुरवठा सहाय्यक महाव्यवस्थापक बिलाल शेख यांच्या हस्तेही संबंधित कर्मचाऱयांचा गौरव करण्यात आला. यावेळी बेस्टचे अधिकारी नेताजी चौगुले, सुरेश मकवाना, सुनील वैद्य उपस्थित होते.
























































