पुण्यात बसचालकाचा विवाहितेवर बलात्कार, आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rape
प्रातिनिधिक फोटो

हॉटेलमध्ये काम करून स्वारगेट बसस्थानकात आलेल्या दाम्पत्याला हेरून, त्यांना बसमध्ये झोपण्यासाठी जागा देतो असे सांगत मिनी ट्रेम्पो ट्रॅव्हलर चालकाने 21 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय 38, रा. वडापुरी, इंदापूर) याला तपास पथकाने पाठलाग करून अटक केली आहे. ही घटना 11 जूनला रात्री 11:30 च्या सुमारास घडली.

तक्रारदार महिला पतीसह दोन दिवसांपुर्वी वाशिममधून पुण्यात कामाला आली होती. हॉटेलमध्ये काम केल्यानंतर दोघेही ११ जूनला रात्री अकराच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी दाम्पत्य नवखे असल्याचे हेरून परिसरात थांबलेला बसचालक नवनाथ भोंग याने त्यांच्याकडे विचारपूस केली. या दाम्पत्याला त्याने बसस्थानकाऐवजी गाडीत झोपण्यास सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा पती लघुशंका करण्यासाठी गेला होता. नेमकी संधी साधून नवनाथने गाडी सुरू करून सातारा रस्त्याकडे नेली. त्याठिकाणी त्याने महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काहीवेळाने महिलेला सोडून देत तो पसार झाला. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ शोधमोहिम हाती घेत आरोपीला बिबवेवाडी परिसरात पाठलाग करून अटक केली.

स्वारगेट तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजनुसार बसचा क्रमांक शोधून तपास सुरू केला. त्यानुसार संशयित बस चालकाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने गाडी जोरात चालविली. मात्र, पोलिसांनी त्याच्या बसला गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी नवनाथने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने केली.

दाम्पत्याला बसस्थानकात झोपण्याऐवजी गाडीत झोपण्यास प्रवृत्त केले होते. मध्यरात्रीच्यावेळी तक्रारदार महिलेचा पती लघुशंकेला गेल्याची संधी साधून चालकाने गाडी पळवून नेत महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी संबंधित चालक आरोपीला अटक केली आहे.
– अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे