आजाराकडे दुर्लक्ष केल्याने वृद्धाचा मृत्यू, पत्नी असल्याचा दावा ठोकणाऱ्या केअरटेकरसह मुलाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एका केअरटेकरसह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आजारामुळे एका 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. वृद्धाच्या आजारपणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केअरटेकरवर आहे.

माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येझदियार एडेल बेहराम (Yezdiar Edel Behram) नावाच्या एका 77 वर्षीय पारशी समाजाच्या व्यक्तीचा 8 ऑक्टोबर 2020 रोजी दादर येथील राहत्या घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी तब्बल एक वर्षाने 15 डिसेंबर 2021 रोजी माटुंगा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस चौकशीमध्ये वृद्धाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या मुलाने गंभीर आजार असतानाही वृद्धाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. तसेच वृद्धाला रुग्णालयातही दाखल न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी केअरटेकर आणि त्यांच्या मुलाला बेड्या ठोकल्या.

या प्रकरणी पोलीस उपायुक्त विजय पाटील (झोन 4) यांनी माहिती देताना सांगितले की, वृद्धाच्या पत्नीचे 2016 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर वृद्धाची मुलगी नताशा सेठना हिने आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी मंगल गायकवाड या महिलेला कामावर ठेवले होते. या महिलेला आणि तिच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

संपत्ती लुटण्याचा होता डाव

दरम्यान, सदर आरोपी महिलेने आपण वृद्धाची पत्नी असल्याचाही दावा केला होता. तसेच तिने परस्पर वृद्धाचा अंतिमविधीही उरकून घेतला होता. महिलेकडे लग्नाचे सर्टिफिकीटही होते आणि तिच्या नावावर लाईटबीलही होते. परंतु पोलीस चौकशीमध्ये हा सर्व डाव संपत्तीसाठी रचल्याचे उघड झाले.