विटा नगरपरिषदेच्या लाचखोर मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम परवान्याची फाइल मंजूर करण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारताना विटा नगरपरिषदेचा मुख्याधिकारी विनायक विजय औंधकर (वय 47, रा. मुख्याधिकारी निवास, मायणी रोड, विटा) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 16) रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

विटय़ातील एका बांधकाम व्यावसायिकाने बांधलेल्या पाच मजली अपार्टमेंटच्या बांधकाम परवान्याची फाइल मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर याच्याकडे दिली होती. फाइल मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी औंधकर याने बांधकाम व्यावसायिकाकडे 2 लाख 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी केली असता त्यामध्ये औंधकर यांनी तक्रारदार यांची बांधकाम परवान्याची फाइल मंजूर करण्यासाठी 2 लाख 50 हजारांची मागणी करून तडजोडीअंती दोन लाख मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तातडीने पथकाने दुपारच्या सुमारास विटा नगरपरिषदेत सापळा लावला.

दरम्यान, नगरपरिषद परिसरात मुख्याधिकारी औंधकर यास तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. औंधकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार अजित पाटील, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, अतुल मोरे, सुदर्शन पाटील, वीणा जाधव आदींनी केली.