
1989 मध्ये उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली. 33 वर्षांपूर्वीच्या खटल्यातील आरोपींपैकी एक असलेल्या इवान सिक्वेराने ही याचिका केली होती. त्यावर सोमवारी विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांच्यापुढे सुनावणी झाली. याचिकेला सीबीआयने तीव्र विरोध केला. सरकारी पक्षाने साक्षीदार म्हणून कोणाला बोलवावे हे सांगण्याचा अधिकार आरोपीला नाही, असे नमूद करीत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
























































