
‘मोहाची घेणार का…’ असे दबक्या आवाजात विचारण्याची आता गरज नाही. आदिवासी भागात आतापर्यंत चोरीछुपे होणाऱया मोहाच्या दारूविक्रीला आता राजमान्यता मिळणार आहे. कारण खुद्द केंद्र सरकारच आता मोहाची दारू बाजारात आणणार आहे. ‘महुआ न्यूट्रिबेव्हरेज’ या नावाने ही दारू थेट वाइन शॉपमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे.
आदिवासी भागात मिळणाऱया मोहाच्या दारूला राजमान्यता मिळावी अशी मागणी वर्षानुवर्षे केली जात होती. ‘हर्बल लिकर’ नावाने या दारूला मान्यता मिळाल्यास आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल असाही सल्ला दिला जात होता. त्यामुळे हिंदुस्थानच्या आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या सहाय्याने आयआयटी, दिल्लीने दोन वर्षांचे यावर विशेष संशोधन केल्यानंतर या पेयाची निर्मिती केली.
750 एमएलला 750 रुपये
सध्या दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार आहे. ‘ट्राइब्स इंडिया’ नावाच्या दुकानात हे मद्य उपलब्ध होणार असून त्याची किंमत 750 एमएल बॉटलसाठी 750 रुपये इतकी आहे. या मद्याच्या निर्मितीसाठी आदिवासी विकास महामंडळाने राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेशी करार केला आहे. आता फक्त आवश्यकता आहे ती उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीची. ती परवानगीही लवकरच मिळेल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले.
5 टक्के अल्कोहोल
सध्या सर्वात कमी अल्कोहोल असलेले मद्य म्हणून वाइन तसेच ब्रीझरला पसंती आहे. वाइनमध्ये 5 ते 15 टक्केपर्यंत तर ब्रिझरमध्ये 4.8 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. ज्याप्रमाणे ब्रिझर विविध फ्लेवरमध्ये विकले जाते त्याच धर्तीवर ‘महुआ’ हे मद्यही 5 टक्के अल्कोहोलच्या प्रमाणात वेगवेगळय़ा सहा फळांच्या स्वादामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.






























































