
उच्च पदावर असलेला अधिकारी हनीट्रॅप मध्ये अडकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. अश्लील चित्रफित समाज माध्यमात वायरल करण्याची भीती दाखवत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. 50 लाखांची खंडणी मागितल्याने त्रस्त झालेल्या अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं.
सात महिन्यांपूर्वी अधिकाऱ्याची एका महिलेसोबत भेट झाली. यानंतर या महिलेने अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवून रूम मध्ये नेलं. या रूम मध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते. यावेळी रूम मध्ये घडलेला प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. काही दिवसांनी एका महिलेने त्या अधिकाऱ्याला रूममध्ये घडलेला प्रकार कॅमेरात रेकॉर्ड झाल्याचे सांगितले. यावेळी महिलेने प्रकरण निपटवण्यासाठी अधिकाऱ्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. अधिकाऱ्याने तीन लाख देत प्रकरण मिटवीले. मात्र सहा महिन्यांनी पुन्हा त्या अधिकाऱ्याला एका अज्ञात इसमाचा फोन आला. या व्यक्तीने अधिकाऱ्याला अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडीओ सार्वजनिक करायचे नसतील तर तुम्हाला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्याने केली. या प्रकाराला त्रासलेल्या त्या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. स्थानिक गुन्हे शाखेने सदर खंडणीखोरास सापळा रचून ताब्यात घेतले व त्याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सादिक खान, झिबल भारसाखरे व इतर तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
























































