‘दिव्याखाली अंधार’ या म्हणीचा अनुभव सध्या चंद्रपुरातील नागरिकांना येत आहे. कारण खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातच वन अधिराऱ्यांचे निवासस्थान बांधण्यासाठी शेकडो जुन्या झाडांची कत्तल सुरू आहे.
चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षकांचे निवासस्थान बांधण्यासाठी शेकडो जुन्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. चंद्रपूर इथे रामबाग नर्सरी भागात हा आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बंगला बांधला जात आहे. या बंगल्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. या बंगल्यासाठी वन विभागाने सदर जागा निश्चित केली. मात्र या ठिकाणी शेकडो मोठी झाडे असून गोंड राजाच्या काळातील काही प्राचीन वास्तूही आहेत. याकडे दुर्लक्ष करीत वन विभागाने ही जमीन बंगल्यासाठी मंजूर केल्याचा आरोप होत आहे.
बंगल्याच्या बांधकामात अडसर ठरणारी ही झाडे सर्रास कापून काढण्यात आली. एकीकडे शंभर कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवायचा आणि दुसरीकडे एका बंगल्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या शेकडो जुन्या झाडांची कत्तल करायची, असा विरोधाभासी हा प्रकार इथे बघायला मिळत आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
याच वन विभागातून निवृत्त झालेले उपवसंरक्षक एस. पंधरे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधलं असून, त्यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. ‘या रामबाग परिसरात रामबाग रोप वाटिका आहे. गोंड राजाचे स्मारक आणि मंदिर आहे. गोंड कालिन वृक्ष याभागात आहेत. पण त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अजूनही काम सुरू आहे. या जागे ऐवजी दुसरी जागा घरासाठी देता आली असती. ज्यांनी ही जागा देऊ केली आहे त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावं’, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी CCF जितेंद्र रामगावकर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.