
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-बल्लारपूर बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी रात्री एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामध्ये चंद्रपूर-बल्लारपूर बायपासवरील वाहतूक एक तास ठप्प होती. अखेर वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
संगीता चाहांदे (वय – 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय – 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि रिक्षाचालक इरफान खान (वय – 49, रा. बाबूपेठ) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर राजकला मोहूर्ले (वय – 34, रा. बाबूपेठ), गीता शेंडे (वय – 50. रा. तुकुम आणि दशरथ बोबडे (वय ५०, रा. वणी) अशी जखमींची नावे आहेत.
अपघातानंतर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव ट्रकवरील (क्र. एमएच. 34, एम 1817) चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक शेजारून जाणाऱ्या रिक्षावर (क्र. एमएच 34, एम 8064) उलटला. अवजड ट्रक रिक्षावर पडल्याने रिक्षाचालकासह चौघांचा जागीच चेंदामेंदा झाला.
























































