
चंद्रपूर जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाला आहे. झेलबाई चौधरी (73) व तिची मुलगी माया पुलगमकर (45)अशी मृतांची नाव आहेत.
बल्लारपुर तालुक्यातील कोठारी गावातील एका घरात झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर अनेक वर्षांपासून राहतात. त्या निराधार होत्या. गावात मागून वा कुणी दिलेल्या अन्नावर भूक भागवित होत्या. सकाळी व संध्याकाळी गावात फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिनाभरापासून अचानक दिसेनाशा झाल्या होत्या. त्या आजाराने ग्रस्त व शरीराने अशक्त असल्याने बाहेर चालणे, फिरणे शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होत्या. शेजाऱ्य़ांनीही कधी त्यांची विचारपूस केली नाही. अशात अन्न व पाणी न मिळाल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला
त्यांच्या घराचे दार उघडेच होते व गावातील मोकाट कुत्रे घरात शिरून त्यांचे अंगावरील कपडे ओढल्याने त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत व शरीराचे लचकेही तोडल्याचे दिसून आले. मायलेकीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व मानवी मनाला सुन्न करून थरकाप उडविणारा होता. शेजारी त्यांचे उघड्या घराकडे डोकावून पाहिल्यानंतर त्यास मायलेकीचा मृत्यू झाल्याचे व शरीर अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तुषार चव्हाण व त्यांचे सहकारी पोलीस तातडीने घटनास्थळावर पोहचून प्रेत ताब्यात घेतले व उतरनिय तपासणीसाठी बल्लारपुरला रवाना केले.
गावकऱ्य़ांनी केले अंत्यसंस्कार
निधी गोळा करून ग्रामस्थांनी मायलेकीवर अंत्यसंस्कार केले. गावतील सामाजिक कार्य करणारे युवक नातेवाईक होऊन खांदेकरी बनले व अंतिम यात्रेत गावातील महिला पुरुषांनी अत्यंत वेदनादायी मनाने सहभागी झाले.
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या व वयोवरुद्ध असल्याने त्यांना जंतुसंसर्ग झाल्याने अन्न घेणे शक्य झाले नसावे. त्यांचा उत्तरनिय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण कळेल अशी माहिती बल्लारपुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ गजानन मेश्राम यांनी दिली.

























































