
होळी हा रंगाचा उत्सव आहे. लोक एकमेकांना रंग लावून हा सण उत्साहात साजरा करतात. पण, यंदा कोरोनाचं सावट या सणावर पडलं आहे. तरीही लोक घरगुती पद्धतीने होळी खेळण्यास उत्सुक असतात. अशा वेळी जर रासायनिक रंग लावले गेले तर त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
आज आपण बाजारात विकल्या जाणाऱ्या रासायनिक रंगाच्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणार आहोत. यात हिरवा, वांगी, चंदेरी, काळा आणि लाल रंग प्रामुख्याने येतात.
हिरव्या रंगात कॉपर सल्फेटचा वापर केलेला असतो. असा रंग डोळ्यात गेल्यास डोळ्यांत खाज येणे, जळजळ होणे किंवा जंतुसंसर्ग होणे असा धोका उद्भवू शकतो. वांगी रंगात क्रोमियम आयोडाईड या रसायनाचा वापर होतो. त्यामुळे लोकांना अस्थमा किंवा अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. तसंच हा रंग गडद असल्याने तो कित्येक दिवस आपल्या त्वचेवर तसाच राहू शकतो.
चंदेरी रंग बनवताना एल्युमिनियम ब्रोमाइडचा वापर केलेला असतो. त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. तसंच काळ्या रंगात लेड ऑक्साईड हे रसायन असतं. ज्याचा थेट परिणाम किडनी किंवा मेंदूवर होऊ शकतो.
होळी खेळताना लाल रंग प्रामुख्याने वापरला जातो. लाल रंगात मर्क्युरी सल्फेटचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्वचेचा कर्करोग किंवा अर्धांगवायू होण्याचा धोका असतो.
जर तुम्हाला सुरक्षित धुळवड खेळायची असेल तर हर्बल रंग कधीही उत्तम ठरतात. त्यांचा रंग आणि चमक रासायनिक रंगांच्या तुलनेने फिकट असते. तसंच रंग दोन बोटांवर घेऊन हलकेच मळला असता त्याचा पोत गुळगुळीत असतो. रासायनिक रंग थोड्याशा रवाळ पोताचे असतात. रासायनिक रंगात तीव्र सुगंध वापरला जातो. मात्र, हर्बल रंगात मात्र तितके तीव्र सुगंध असत नाहीत.




























































