छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल 2 फेबुवारीपासून; चार दिवस कलेच्या प्रतिभेचा महासंगम

कलाप्रेमी मुंबईकरांसाठी कला, क्रीडा, संस्कृती आणि परंपरेचा कला महोत्सव अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल येत्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कला महोत्सवात सृजनशील कलाकृतींसोबतच खाद्य महोत्सवाची मेजवानी, रसिकांना मुग्ध करणारी संगीत संध्या, लहान मुलांना प्रोत्साहन देणारी कलाशिबिरे असणार आहेत.

‘वेध’ आणि ‘आम्ही दादरकर’ या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या वर्षी 2022 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी हाच महोत्सव त्याच ऊर्जेने, भव्यतेने 2 ते 5 फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर’ येथे होणार आहे. हा महोत्सव सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सवात वनिता समाज येथे नावाजलेल्या चित्रकारांच्या ‘कलाक्षितिज आर्ट गॅलरीकडे रसिकांचे पाय आपोआप वळतील. कलात्मक वस्तूंचे शॉपिंग स्टॉल्स, लहानग्यांसाठी कलाशिबिरांचे आयोजन असेल. जे.के. अॅपॅडमीतर्फे घेण्यात येणारी निसर्ग चित्रण स्पर्धा, मंथन अॅपॅडमी आयोजित छायाचित्रण स्पर्धा होणार आहे. तसेच ‘मंथन अपॅडमी’तर्फे घेण्यात येणाऱया डुडल या उपक्रमामध्ये कलात्मकतेविषयी तसेच कला व जाहिरात क्षेत्रातील करीअरच्या संधी या विषयांवर चर्चासत्रदेखील होणार आहे. याशिवाय ‘पाका&तला कट्टा, शिवाजी पार्क रियुनियन… भेट जुन्या दोस्तांची, नात्यांची, आठवणींची’  आणि दादरच्या आठवणींना उजाळा देणाऱया ‘आठवणीतले दादर’ उपक्रमांचा समावेश या कला महोत्सवामध्ये असणार आहे. अशा अनेकविध कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या या कला महोत्सवामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वेध फाऊंडेशनचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांनी केले आहे.

लज्जतदार पदार्थांचा आस्वाद आणि सेल्फी पॉइंटही

म्युनिसिपल जिमखानामध्ये आयोजित ‘मुंबई फूड फेस्टिव्हल’मध्ये सुमधुर संगीताच्या साथीने खवय्यांना लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. दादरकरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दादर गॉट टॅलेंट’ (Dadar’s Got Talent) ही नृत्य आणि गायन स्पर्धाही होणार आहे. तसेच ‘कलांगण’ या संस्थेचा ‘लोकगाथा’ हा  गाण्याचा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आकर्षक रंगसंगती साधून तयार केलेले सेल्फी पॉइंट्स दादरकरांच्या बरोबरीने मुंबईकरांचेही लक्ष वेधून घेणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 2 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल – 2023, या कलामहोत्सवाचे निमंत्रण आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व या महोत्सवाचे संकल्पक, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांना देण्यात आले.