शक्तिरंग – आजारपणाच्या अनुभवातून उभारली संस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनघा सावंत

कविता शानभाग यांनी आयुष्यात अचानक उद्भवलेल्या अपस्मार (एपिलेप्सी) या व्याधीवर केवळ मातच केली नाही, तर 2006 मध्ये ‘चाइल्डरेझ’ ही संस्था स्थापन करून अपस्मारग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या पालकांना सर्वतोपरी मदत करण्याचा विडाही उचलला. विविध प्रकारचे अपंगत्व आणि त्यांच्या विशेष गरजा याविषयीचे त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

कविता या मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र पदवीधर आहेत. तसेच समुपदेशनात त्यांनी पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे. कविता यांनी दोन दशकांहून अधिक काळ बँकेत नोकरी केली. 1992 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी मातृत्व प्राप्त करताना त्यांना अचानक अपस्मार/फिट या व्याधीला सामोरे जावे लागले आणि तिथूनच सुरू झाला त्यांचा एक वेगळा प्रवास…

कविता या आजाराला धाडसाने सामोरे गेल्या. उपचार घेतानाच या व्याधीविषयी अधिक जाणून घेता यावे यासाठी त्या 1992 मध्ये इंडियन एपिलेप्सी असोसिएशन, मुंबईच्या ‘सन्मान’ या आधार गटात सामील झाल्या. कविताने अपस्मारावर अनेक शोधनिबंध सादर केले. त्यांनी इंडियन एपिलेप्सी असोसिएशन’चे प्रतिनिधित्व केले. 1994 मध्ये यासंदर्भात अधिक कार्य करण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथून त्यांनी विशेष शिक्षणात बीएड केले. त्या ‘लाइफ लाइन एक्स्प्रेस’च्या एपिलेप्सी क्लिनिकमध्ये एपिलेप्सी एज्युकेटर आहेत. त्यांनी 2001 मध्ये बहुविध अपंग मुलांसाठी सर्वसमावेशक माहितीची गरज ओळखून www.childraise.com हे संकेतस्थळ सुरू केले. ज्यात विशेष गरजा असलेल्या मुलांच्या आणि प्रौढांच्या सक्षमीकरणासाठी माहिती उपलब्ध करून दिली. 2006 मध्ये त्यांनी ‘चाइल्डरेझ’ ही संस्था प्रत्यक्षात आणली.

2007 मध्ये त्यांनी बँकेच्या नोकरीचा राजीनामा देत संपूर्ण वेळ संस्थेसाठी देण्याचे ठरवले. याविषयी कविता म्हणाल्या, मी स्वतः यातून गेल्यामुळे याविषयी काहीतरी करावे या ध्येयातून ‘चाइल्डरेझ’ची निर्मिती झाली. ‘चाइल्डरेझ’ म्हणजे पुनर्वसन, जनजागृती, माहिती, आधार, शिक्षण आणि विशेष शिक्षण. ‘चाइल्डरेझ’ची स्थापना झाली तेव्हा अपंगत्वाविषयी तसेच विशेष गरजा असलेल्या संस्थांची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध नव्हती. यासंबंधित सर्वांना चुटकीसरशी माहिती मिळावी यासाठी या साऱया सेवा उपलब्ध करून दिल्या.

जनजागृती आवश्यक
गतिमंदत्व असलेल्या 70 टक्के मुलांमध्ये अपस्मार असल्याचे दिसून येते, पण अपस्मार हा कमी, सर्वसामान्य तसेच उच्च बुद्धिमत्ता असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो. अपस्माराची कारणे आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. शंभरात एक व्यक्ती असे अपस्माराचे प्रमाण आहे, पण त्याप्रमाणात या विषयावर जनजागृती नाही. अपस्मार हा संसर्गजन्य रोग नसून ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि ती औषधांनी नियंत्रित केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन
संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळय़ा अपंगत्वाविषयी माहिती पुरवली जाते. सेरेब्रल पाल्सी (मस्तिष्क पक्षाघात), शारीरिक अपंगत्व, अंधत्व, बहिरेपणा, अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, अपस्मार या साऱयांसाठी असलेल्या विशेष शाळा, कार्यशाळा, आधार गट, पुनर्वसनाची अनेक संसाधने आणि पर्यायांची माहिती, पालकांच्या गरजा, त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेऊन योग्य ते मार्गदर्शन तसेच समुपदेशन करतात. ‘चाइल्डरेझ’चे बरेचसे काम अपस्मार/फिट येणे आणि अध्ययन अक्षमता या अदृश्य व्याधींवर असल्यामुळे हे काम प्रकाशात येणे महत्त्वाचे आहे. कविता यांचे ‘जर्नी टू एम्पॉवरमेन्ट (सक्षमीकरणाचा प्रवास)’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी ते पथदर्शक आहे.