महिलेने दिला जुळ्यांना जन्म, पण दोघांचेही वडील वेगळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बिजींग

चीनमधील क्झीआमेन शहरात एका महिलेने काही दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र या दोन्ही बाळांचे वडील वेगळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही मुलांचे डीएनए वेगळे आल्याने पत्नीने दुसऱ्या कुण्या पुरुषासोबतही शारीरिक संबंध ठेवल्याचे तिच्या पतीला कळाले असून त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे.

या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘हेटेरोपॅटर्नल सुपरपेक्युनडेशन’ म्हणतात. यात एकच महिला कमी कालावधीत दोन पुरुषांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करते. तिच्या गर्भात दोन पुरुषांच्या शुक्राणूपासून जुळ्या बाळांचा गर्भ तयार होतो. या महिलेच्या बाबतीत देखील असेच घडले आहे. या महिलेने तिच्या नवऱ्याची फसवणूक करून तिच्या मित्रासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र त्यांचे संबंध फक्त एका रात्रीपुरता मर्यादित होते. त्यानंतर ही महिला गरोदर राहिली तेव्हा तीला जुळे असल्याचे समजले. मात्र प्रसूतीनंतर काही कारणास्तव तिच्या जुळ्या बाळांच्या वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागल्या त्यात त्या बाळांचे डीएनए वेगळे असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यावरून त्यांचे वडील देखील वेगळे असल्याचे डॉक्टरांनी महिलेच्या नवऱ्याला सांगितले. त्यानंतर तिने नवऱ्यासोबत केलेली फसवणूक मान्य केली. या प्रकारानंतर त्या महिलेच्या नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला असून फक्त त्याच्याच बाळाचा सांभाळ करण्याची तयारी दाखवली आहे.