
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकार व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी सांप्रदाय मंडळींनी आपल्या प्रवचन, कीर्तन माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेचा जागर करीत प्रबोधन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त ह.भ.प. गजानन पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला प्रारंभ झाला. या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विल्लेवाट, प्लास्टिक वापर बंदी, झाडे लावा, व्यसनमुक्ति, मासिक पाळी व्यवस्थापन, शौचालय वापर या विषयी मार्गदर्शन वारकरी करणार आहेत.
यावेळी प्रास्ताविक करताना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्री बबनराव लोणीकर यांनी, महाराष्ट्रात स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी राज्यातील वारकरी सांप्रदायचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात वारकरी यांच्या कीर्तन, प्रवचनावर अजूनही विश्वास असल्याने ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक स्वच्छतेचा पुरस्कार करणारी आहे. त्यामुळेच सर्वात प्रथम ‘हागणदारी मुक्त’ होण्याचा मान सिंधुदुर्गला मिळालेला आहे. त्यात प्रशासानाचे मोठे योगदान आहे, असे आम्ही मानू नये. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा सिंधुदुर्ग स्वच्छतेत पुढे गेला आहे. परिणामी या कार्यक्रमात भविष्यातील विषय घेऊन आपल्याला प्रबोधन करावयाचे आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्राम पंचायतमध्ये आपल्याला जायचे आहे, असे आवाहन केले.
ह.भ.प. पाटील यांनी, आपले अध्यात्म तत्वज्ञानावर आधारित आहे. भोंदूगिरीवर नाही. वारकरी सांप्रदायावर नागरिकांचा विश्वास आहे. त्यासाठी आपल्याला स्वच्छतेवर कीर्तन, प्रवचन यातून प्रबोधन करायचे आहे. राज्यातील ४४ हजार १९८ गावांत हा उपक्रम राबविला जाणार आहे. मात्र, यावेळी धर्मावर भाष्य करायचे नाही. शिक्षक, मुले, गावातील विकास मंडळे, नागरिक यांचा सहभाग घ्यायचा आहे. गावात स्वच्छता दिंडी काढायची आहे. स्वच्छतेचे फायदे व गरज विषद करायची आहे. भविष्याचा विचार करून लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवायचे आहे. तसेच प्रत्येक गावात जाऊन सामुदायिक स्वच्छता शपथ घ्यायची आहे, असे आवाहन केले.
२३ जानेवारीला पंढरपूरमध्ये कार्यशाळा
यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा २३ जानेवारी रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्वच्छतेच्या प्रबोधनची रूपरेषा ठरविली जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रवचनकार व कीर्तनकार यांनी उपस्थित राहावे. महाराष्ट्रात २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ दिंड्या १ फेब्रुवारी पासून जाणार आहेत. ते १८ फेब्रुवारीला परत येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आहे. यासाठी एका वारकरी व्यक्तीला एका गावासाठी १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. एका दिवसात दोन गाव करायचे आहेत. सर्व कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींनी अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
































































