हवामानाचा अंदाज बदलतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास औंधकर

सध्या हवामानाचे तंत्र बदलल्याचेच दिसून येते. गेल्या काही वर्षांत फेब्रुवारी ते मार्च या काळात महाराष्ट्र गारपिटीचा अनुभव घेत आहे. हवामानबदलाचा हा परिणाम गारपिटीच्या संकटाद्वारे अचानक सामोरा आला असला तरीही हवामानातील या बदलांची सुरुवात फार पूर्वीच झालेली आहे. तापमानवाढ हा त्यातला प्रमुख घटक आहे. याला अनुसरूनच या वर्षीची जागतिक हवामान दिवसाची ‘वातावरण व पाणी’ ही संकल्पना आहे.

निसर्गचक्रात वर्षानुवर्ष बिनचूकपणे होणाऱया घटनांपैकी एक म्हणजे 1 जूनला भारतात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस; परंतु गेल्या काही वर्षांत जगभरात नैसर्गिक नियमितता नाहीशी होऊन अनपेक्षित बदलांचे प्रमाण वाढत आहे. हवामानातील अशा मूलभूत आणि इतर अनेक बदलांच्या अभ्यास हवामानशास्त्रात केला जातो. हवामानातील बदल, त्यामागील कारणे व उपाय या बाबी सरकारपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. याच हेतूने सन 1961 पासून जागतिक हवामान संघटनेने 23 मार्च हा दिवस हवामान दिन म्हणून जगभर साजरा करण्याचे ठरविले.

सध्या हवामानाचे तंत्र बदलल्याचेच दिसून येते. गेल्या काही वर्षांत फेब्रुवारी ते मार्च या काळात महाराष्ट्र गारपिटीचा अनुभव घेत आहे. वारा, वादळ, पाऊस आणि गारपीट या अस्मानी सुल्तानीच्या कचाटय़ात महाराष्ट्रातला शेतकरी आणि पर्यायाने सगळेच अडकलेले आहेत. या वर्षी जागतिक हवामान दिवसाची मुख्य संकल्पना ‘वातावरण व पाणी’ हे आहे. एकूणच पृथ्वीवरील हवामानात होणारे बदल हे केवळ पृथ्वीवरील घटकांवर अवलंबून नसून सूर्यावरील सौरडागांची संख्या कमी झाल्याने पृथ्वीवरील वैश्विक किरणांचा जास्तीत जास्त मारा वाढला अन् विषुववृत्ताच्या भागात ढगांची निर्मिती होऊन पावसाचे प्रमाण वाढलेले आढळून आले आहे. या वर्षीच्या सौरडागांच्या नोंदी पाहिल्या तर 75 टक्के काळात सूर्यावर कोठेही सौरडाग आढळलेले नाहीत अन् गतवर्षी हीच परिस्थिती 78 टक्के एवढी होती, म्हणजेच सूर्य अतिशय मंदावलेला आहे. या मंदावलेल्या प्रक्रियेमुळे येत्या उन्हाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी सकाळी सातपर्यंत थंडीला सामोरे जावे लागत आहे.

सूर्य थंडावत चालल्याची कारणे काय आहेत याचा शोध सध्या सुरू आहे. सौरडागांची संख्या कमी झाली की, पृथ्वीच्या वैश्विक किरणांचा मारा वाढतो, चालू वर्षीच्या नोंदीनुसार वैश्विक किरणांच्या प्रमाणात कमालीची वाढ दिसून येते आहे व ही वैश्विक किरणे पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या आकाशातील पावसासाठी आवश्यक ढगांची निर्मितीस मदत करून मोठय़ा प्रमाणात वाढ करतात. विषुववृत्ताच्या भागात मोठय़ा प्रमाणात ढगांची निर्मिती झाल्याने सूर्याकडून येणारी उष्णता या ढगांमध्ये शोषली जात आहे यामुळे याही वेळी हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये तीव्र बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तर भारतात पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुविय वारे अद्यापही सक्रिय आहेत अन् विषुववृत्ताच्या भागात ढगांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती झाल्याने आपल्या महाराष्ट्रात हिवाळ्यातदेखील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे आता मार्च महिन्यात उत्तरेकडील अति थंड वारे व समुद्राकडून पठारी प्रदेशावर उत्तर दिशेला वाहून बाष्प याचा संयोग होतो आहे व यामुळे सध्या विदर्भ, मराठवाडय़ासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गारपीट व पावसाने धुमाकूळ घातला आहे.

16 मार्च रोजी प्राप्त माहितीनुसार प्रशांत महासागरातील तापमान सरासरीएवढे असून येत्या पाच-सहा महिन्यांत थोडय़ा प्रमाणात घट दिसून येते आहे. त्याचवेळी ला निनोमध्ये पोषक वातावरण निर्माण होत आहे. यामुळे यावर्षी आपल्याला उन्हाळय़ातील तापमानात मोठी वाढ दिसून येणार नाही म्हणजेच उन्हाळा सुसह्य होईल तसेच वेळेआधीच पावसाला सुरुवात होईल असेही संकेत मिळत आहेत.

पुढील काळात सौरसाखळी 25 आणि पुढीलच्या काळात (कदाचित इ. सन 2100 पर्यंत) सूर्य आणखी मंदावेल की काय अशी शक्यताही वाटू लागली आहे. तसे झाल्यास सूर्यावरील या बदलामुळे पृथ्वीला एका छोटय़ा हिमयुगाला सामोरे जावे लागू शकते. या हिमयुगास ऐड्डी न्यूनतम संबोधले जाईल. याची प्रचीती आताच येऊ लागली आहे. सन 2015 साली माझ्या एका लेखात मी सन 2020 पासून दिल्ली व परिसरात बर्फवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. गत व याही वर्षी मार्च महिन्यात दिल्ली व परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली आहे.

या वर्षीच्या जागतिक हवामान दिवसाच्या ‘वातावरण व पाणी’ या संकल्पनेला सध्याचे पृथ्वीवरील हवामानदेखील पोषक असेच असेल असे दिसत आहे.

(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत)

[email protected]