मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही – फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये रणकंदन माजले आहे. विरोधकांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहामध्ये मांडण्याची मागणी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व काही नियमांप्रमाणे सुरू असून न्यायालयात टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला देणार असे स्पष्ट करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

विरोधक हे मतांचे राजकारण करत आहेत. विरोधक समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, ओबीसींच्या 52 टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. तसेच यापूर्वी आधिच्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही अहवाल सभागृहात मांडला नाही. मी या ठिकाणी वचन देतो की विधेयक आणण्याआधी एनटीआर मांडू व मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ.

मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही
विरोधकांकडून सातत्याने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मुस्लिम समाजातील जातींना आरक्षण देण्यात आलेलं आहे. हे आरक्षण युतीच्या सरकारने दिलेले आहे. आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक आहे. मुस्लिम समाजाने मागासर्व आयोगाकडे जावे. तसेच विरोधक मुस्लिम समाजाला फसवत आहेत. विरोधक ढोंगी आहेत. त्यांना फक्त मतांचं राजकारण करायचं आहे. सत्तेत असताना तुम्ही मुस्लिम समाजाला स्कॉलरशीप का दिली नाही? असा सवाल फडणवीस यांनी विरोधकांना केला. तसेच विरोधकांना फक्त मुस्लिम समाजाची मतं हवी आहेत, पण आम्हाला मुस्लिमांसह सर्व समाजांच्या मागे उभे राहायचे आहे.