
गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱयांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जीवनावश्यक आणि आवश्यक सेवासुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये, असे बजावतानाच अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
या बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे तसेच राज्याच्या व जिह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राजेश टोपे यांनीदेखील आपल्या सूचना मांडल्या. जिह्याजिह्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी उपचार पद्धतीबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कुठलाही अतिरेक नको – सीताराम कुंटे
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आपण कडक निर्बंध लावले आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.
- सरकारने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाहीत या दृष्टीने चांगले नियोजन करा.
- विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठय़ा प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्या दृष्टीने या वेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे पहा.
पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडिट करून घ्या
ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे रेमडेसिवीरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावीत. आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान पंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.
अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका!
अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा. कारण संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.































































