कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2406

महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठक संपली आहे. तब्बल चार तास ही बैठक चालली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि मेट्रोच्या मुख्य संचालिका अश्विनी भिडे व अधिकारीवर्ग या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती नाही, अशी माहिती मुखमंत्र्यांनी यावेळी दिली.

रोज आढावा बैठक सुरू असून आवश्यक माहिती घेतली जात आहे. आजही आढावा बैठक घेण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच कोणत्याही विकासप्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही. उलटं ते प्रकल्प अधिक गतीने कसे होतील याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. त्यात प्राधान्यक्रम ठरवून यापुढील वाटचाल होईल, असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेनबाबत कोणताही निर्णय सध्या घेतलेला नाही, फक्त दोन दिवसांपूर्वी आरे कारशेडला स्थगिती दिली आहे, विकासकामांना स्थगिती दिलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच सध्या सुरू असलेले प्रकल्प अधिक गतीने कसे पूर्ण होतील आणि त्यासोबत आम्हाला जी कामं करायची आहेत ती यात कशी सामावून घेतली जाईल याचाही आम्ही विचार करत आहो, असेही ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी मंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गतीने पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. प्रकल्प कोणत्या अवस्थेत आहेत आणि मेट्रो, समृद्धी मार्ग या प्रकल्पांचा आढावा घेतला, असे पाटील म्हणाले. तसेच ज्या भागातून हे प्रकल्प जात आहे त्या भागातील लोकांचा फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प वेगाने कसे पूर्ण होईल याचा आढावा घेतला असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या