विरोधी पक्षात असताना आम्ही राजभवनात रोज येत नव्हतो! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकीय हवा कशीही असू द्या, इथली हवा थंड आहे. राजभवनात आम्ही नेहमी येत नाही, पण राज्यपालांशी आमचा वेळोवेळी संवाद सुरूच असतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटन सोहळ्यात तुफान टोलेबाजी केली. राजभवन व दरबार हॉल आम्हाला काही नवीन नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही वर्षातून एखाद-दोनदा शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो, अगदी आम्ही रोज येत नव्हतो, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना लगावला.

राजभवनात नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे  उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी दरबार हॉलचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की,  ही नवीन रूप धारण केलेली वास्तू आहे. यात ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे मनापासून आभार आहेत. कारण दरबार हॉलचे अप्रतिम असे सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले. मुंबईतील राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱया बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असे देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे.

थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी साप

राजकीय हवा कशीही असू द्या, इथली हवा थंड आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. इथून सर्पमित्रांकडून विषारी सर्प पकडल्याचे फोटो आपण पाहतो. अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

‘त्या’ शपथविधीची उपस्थितांना आठवण

या सोहळ्याच्या निमित्ताने राजभवनावरील फिल्म दाखवण्यात आली. राजभवनावर झालेले सोहळे, कार्यक्रम, शपथविधीची माहिती देण्यात आली. काही वर्षांपूर्वी याच राजभवनावर पहाटेचा शपथविधी झाला होता. पूर्वी झालेल्या शपथविधीच्या आठवणी या फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या तेव्हा उपस्थितांना पहाटेच्या शपथविधीची आठवण आल्याचे जाणवले.

शिवसेनाप्रमुखांना तत्कालीन राष्ट्रपतींनी  राजभवनावर आमंत्रित केले होते

या सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनाच्या आठवणी जागवल्या. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राजभवनावर आमंत्रित केले होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मला भेटायला बोलावले होते. अशा अनेक आठवणी मनात असल्याचे आवर्जून सांगितले. या वास्तूने 100 वर्षांहून अधिक काळात घडलेल्या घटना-घडामोडी पाहिल्या. 30 एप्रिल 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याच वास्तूत केले त्याचा विशेष आनंद होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.