थंडीचा कडाका पुन्हा वाढला, निफाड 6 तर नाशिक 8 अंशांवर

63

सामना प्रतिनिधी, निफाड

उत्तर हिंदुस्थानातील शीतलहरींमुळे तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिह्यातील निफाडमध्ये आज किमान तापमान 6.2, तर नाशिक शहरात 8.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. थंड वाऱयामुळे दिवसभर कमालीचा गारवा जाणवत होता.

राज्यात डिसेंबरअखेर थंडीची लाट आली होती. त्यावेळी निफाड तालुक्यातील उगाव, कुंदेवाडी, कळवणच्या मानूरमध्ये पारा 0 ते 1 अंशापर्यंत, तर नाशिकचा पारा 5वर घसरला होता. त्यानंतर 6 जानेवारीपासून तापमानात काहीशी वाढ झाली. 21 जानेवारीला नाशिकचा पारा 12 अंशावर पोहचला. आता 24 जानेवारीपासून पुन्हा थंडी जाणवू लागली. नाशिकमध्ये 24 जानेवारीला 9.9, 25 जानेवारीला 9.2, 26 जानेवारीला 8.3, तर आज 8.1 इतके तापमान होते.

निफाडजवळील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातही आज किमान 6.2 इतके तापमान होते. जिह्यातील कमाल तापमान 23 ते 25 अंशांदरम्यान आहे. त्यामुळे दिवसाही गारठवणाऱ्या थंडीचा अनुभव नाशिककर घेत आहेत.

उद्या थंडीची लाट
नाशिक व परिसरात मंगळवारी, 29 जानेवारी रोजी थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील पाच दिवसात पारा सात अंशावर घसरण्याची शक्यता आहे. हे वातावरण गहू व कांद्यासाठी पोषक आहे. मात्र, द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या