रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन मुलीची आत्महत्या; लोणी पोलिसांकडून तिघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविद्यालयात जाताना तरुणांकडून होणाऱया छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.

मयूर दिलीप पवार (रा. राहुरी फॅक्टरी), किरण मच्छिंद्र गुंजाळ (रा. बाभळेश्वर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, साहील कैलास राजळे (रा. बाभळेश्वर) हा फरार आहे.

पिंपरी निर्मळ येथील 18 वर्षांची अल्पवयीन मुलगी बाभळेश्वर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना वरील आरोपी तिला वारंवार त्रास देत होते. यामुळे या मुलीने पिंपरी निर्मळ येथील पंढरीनाथ सारंगधर पवार यांच्या शेततळ्यामध्ये आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत मुलीच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे तपास करीत आहेत.

दरम्यान, बाभळेश्वर परिसरात महाविद्यालय असल्याने येथे ग्रामीण भागातून येणाऱया मुलींची संख्या मोठी असते. या घटनेमुळे मुली व पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.