कथा…सोबत.

32

सोबत..माधुरी महाशब्दे

कोणत्याही कृतीमागचा हेतू महत्त्वाचा. एकदा का निर्मळ हेतू समजला की विश्वासाचे धागे अतूट होतात…

डोंगरातली ती चिंचोळी पायवाट सरता सरत नव्हती. एक डोंगर चढली ती. चढावावर दम तर लागलाच, पण उतारावर अधिकच सावध राहावे लागणार होतं. जरा तोल गेला तर संपलंच मग! खांद्यावर ओझं तर होतंच, पण मनावरचं ओझं, त्याचं काय? ते दडपण असह्य होतं.

हऱयाला, पारूच्या नवऱयाला रात्री हुडहुडी भरून ताप भरला होता. रात्र कशीबशी काढली. उजाडताच निघाली ती तालुक्याच्या दवाखान्याकडे. हऱया कित्येक दिवस आजारीच होता. अस्थिपंजर झालेलं शरीर. वैदूकडे जाऊन गुण येत नव्हता. पण गाठीशी पै नाही. वाडीतल्या साऱयांचीच अशी परिस्थिती. तालुक्याला सरकारी दवाखाना होता. तिथेच जायला हवं होतं. प्रत्येकजण आपल्याच विवंचनेत. मदतीला तरी कोण येणार? दोन कच्च्या बच्च्यांना घरी सोडून पारू निघाली हऱयाला खांद्यावर घेऊन. डोंगर चढून दमल्यावर त्याला खांद्यावरून उतरवून ठेवले. जरा दम घेतला. पण थांबणार तरी किती? अजून एक डोंगर चढायचा होता. हिंमतीने उठली पुन्हा लागली चढायला. थोडय़ा वेळाने लक्षात आलं तिच्या कोणीतरी पाठलाग करतंय. जरा वळून पाहिलं तर एक पुरुष होता तो. तिच्या वाडीतला नव्हता. घाबरली पण चालत राहिली. पुन्हा पाचोळय़ाचा आवाज, त्याच्या पावलांचा. पुन्हा थांबून तिने पाहिलं तर तोही थांबला. त्याच्या नजरेतला तो भाव पाहून पारू हबकली. आजूबाजूला चिटपाखरू नव्हतं. मदतीला कोण येणार होतं हाक दिल्यावरही?

पारूच्या फाटक्या कपडय़ांतून तिचं मुसमुसतं तारुण्य पाहून ‘तो’ लालचावला होता. त्याच्यामधला ‘पुरुष’ (नर) त्याच्या नजरेतून तिला जाणवला होता. कोणत्याही क्षणी तो आपल्याला गाठेल. मनोमनी थरारली ती. असहाय्य होती. दवाखान्यात कधी पोहोचतो असं झालं होतं तिला. हा डोंगर लहान होता. आता फार अंतर राहिलं नव्हते. ती वेग वाढवायचा प्रयत्न करू लागली. त्यानंही वेग वाढवला होता. पारू थांबली. भराभर चालल्यामुळे तिला दम लागला होता. नाईलाजाने खांद्यावरनं हऱयाला तिनं खाली ठेवलं. तो आता जवळ आला होता. पारूनं असहाय्यतेने त्याच्याकडे पाहिलं. काय नव्हतं तिच्या नजरेत? भीती, असहाय्यता, दयेची, मदतीची याचना. त्याच्या नजरेला ते सारं जाणवलं. हऱयाकडे एक नजर टाकली पारू क्षणभर थरारली. त्यानं काही न बोलता हऱयाला खांद्यावर घेतलं आणि वाट चालू लागला. पारू अविश्वासानं बघतच राहिली. मग भानावर येऊन त्यामागे चालू लागली. आता दवाखाना टप्प्यात होता. हऱयाची अवस्था पाहून त्याला डॉक्टरांनी ताबडतोब उपचारासाठी आत घेतलं.

पारूनं कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आता मादीला भक्ष्य करणाऱया नराचा लवलेशही नव्हता. त्याच्यामधला ‘माणूस’ जागा झाला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या