
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी फेसबुकवर दिशाभूल करणारी चुकीची पोस्ट टाकून चारित्र्यहनन केल्याची तक्रार अक्कलवंत राठोड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारीत म्हंटले आहे की, दिलीप धोंडगे यांनी फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह बातमी लिहून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दिलीप धोंडगे यांनी फेसबुकवर उमेदवाराचे चारित्र्यहनन करणारी व्हिडीओ क्लिपही टाकली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच ६ एप्रिल रोजी होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथील सभा रद्द झाल्याची चुकीची माहितीही दिलीप धोंडगे फेसबुकवर टाकली आहे.
दिलीप धोंडगे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग असून, याची गंभीर दखल घेवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही तक्रार गंभीरपणे घेतली असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.






























































