कोरोना आटोक्यात; डेंग्यू, चिकनगुनियाने डोके वर काढले! सोलापूर शहरातील रुग्णालये ‘हाऊसफुल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारी आटोक्यात येत असताना शहरी भागामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या साथीने डोके वर काढले असून, त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे अधिक असल्याने बालरुग्णालये ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.

गेल्या दीड वर्षापासून नागरिक कोरोना महामारीने त्रस्त आहेत. आता कुठे निर्बंध शिथिल होऊन जनजीवन सुरळीत होत असताना, डेंग्यूच्या तापाने फणफणण्याची वेळ लोकांवर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती उद्भवते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही शहरात डेंग्यूचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. शहरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. प्रत्येक रुग्णालयात दररोज किमान 10पेक्षा अधिक रुग्ण दाखल होत असून, त्यामध्ये शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश असल्याचे उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शहरातील झोपडपट्टय़ांपासून उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱया लोकांमध्येही डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूबरोबरच अंगदुखी आणि सांधेदुखीशी संबंधित चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही रुग्णसंख्या थोपविण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन प्रशासनाप्रमाणेच नागरिकांसमोरही आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण अधिक संख्येने उपचारांसाठी दाखल होत आहेत. ग्रामीण भागात कोरोना अजून आटोक्यात आलेला नसताना शहरी भागातही संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबरोबर डेंग्यू वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे.

– डॉ. निर्मल तापडिया, फिजिशियन.

डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांना थंडीताप येतो, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी आणि अंगावर पुरळ येतो. किमान सहा दिवसांपर्यंत ताप राहतो. तापामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. या आजारामध्ये रुग्णाला अशक्तपणा जास्त जाणवतो. चिकुनगुनियाचे रुग्णही उपचारांसाठी येत आहेत.

– डॉ. मनोहर कोरे