रेल्वेच्या एटीव्हीएम मशीनला कोरोना संसर्ग! कोटय़वधी रुपयांच्या मशीन भंगारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय लोकलमध्ये 15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लस प्रमाणपत्राआधारे रेल्वेने तिकीट व पास विकत देऊन प्रवासास मुभा दिली आहे. त्यानंतर यूटीएस ऍपला युनिव्हर्सल पासशी  संलग्न करण्यातही रेल्वेला यश आले असले तरी एटीव्हीएम मशीन युनिव्हर्सल पासबरोबर अद्याप संलग्न करता आलेले नाही. त्यामुळे कोरोना निर्बंध कमी होत असताना एटीव्हीएम मशीनवरून मात्र प्रवाशांना तिकीट वितरण करण्यात अडचणी येत आहेत.

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच एटीव्हीएम मशीनवरून तिकीट विक्री कशी करायची याबाबत अडचण निर्माण झाली आहे. रेल्वेची आयटी विंग ‘क्रिस’हिने जगात प्रथमच यूटीएस मोबाईल ऍप लसीकरण प्रमाणपत्राशी संलग्न करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच तिकीट व पास ऑनलाइन वितरण करण्याचा चमत्कार केला आहे. यूटीएसवर कोविड सर्टिफिकेट इश्यू करण्याचा प्रयोग जगात कुठेही झालेला नाही. यात दोन भिन्न यंत्रणा परस्परांशी संवाद साधून सर्टिफिकेट तपासून तिकीट प्रदान करीत आहेत, मात्र एटीव्हीएमवर हे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही हे विशेष..!

602 एटीव्हीएम  

मध्य रेल्वेवर कोरोनापूर्व काळात 78 स्थानकांवर 602 एटीव्हीएम मशीनवर 719 सेवानिवृत्त कर्मचाऱयांना सेवा पुरवठादार तिकीट विक्रीसाठी नियुक्त करण्यात आले होते. पश्चिम रेल्वेच्या अर्थसंकल्पात एटीव्हीएम मशीन बसविण्यासाठी 16.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेसाठी 45  लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. कोरोनाकाळात दीड ते दोन वर्षे एटीव्हीएम मशीन विनावापर पडून राहिल्याने नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील रांगांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

27 टक्के विक्री…

कोरोनापूर्व काळात एकूण तिकीट विक्रीच्या तुलनेत ‘एटीव्हीएम’ मशीनमार्फत सरासरी 27 टक्के तिकीट विक्री होत होती. तर तिकीट खिडक्यांवरून सरासरी 54 टक्के, जेटीबीएसद्वारे सरासरी 18 टक्के, तर यूटीएस ऍपद्वारे 5.4 टक्के तिकीट विक्री होत होती.

ज्येष्ठ कर्मचारी मिळेनात…

पश्चिम रेल्वेवरील काही एटीव्हीएम सेवा पुरवठादार नेमून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत; परंतु मध्य रेल्वेच्या एटीव्हीएम बंद असल्याने प्रवाशांना जलद तिकीट विकत मिळण्याचा एक पर्याय बंद झाला आहे. एटीव्हीएम ऑपरेट करण्यासाठी रेल्वेने निवृत्त कर्मचाऱयांना फॅसिलेटर म्हणून नेमले होते, परंतु कोरोनामुळे सीनियर सिटीझन काम करण्यासाठी तयार नाहीत.

आम्ही एटीव्हीएम मशीनवर पूर्वीप्रमाणेच प्रवाशांना तिकीट विक्री करण्यासाठी सेवा पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत.
– अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे