जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात कोरोना रुग्णसंख्या दोन लाखांवर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. संसर्गाचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील काळात जर कोरोना रुग्णांची संख्या 80 लाखांवर पोहोचली आणि मृत्युदर 1 टक्का राहिला तर 80 हजार मृत्यू होऊ शकतात. तेव्हा ओमायक्रोन किंवा सध्याच्या कोरोनाची लक्षणे सौम्य असल्याच्या वृत्तांवर अवलंबून राहू नका, कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करा व  राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पत्र लिहून पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाची लक्षणे सौम्य आढळत, रुग्णालयीन रुग्णसंख्या कमी आहे या भरोशावर राहू नका. वैज्ञानिकदृष्टय़ा विचार करून उपाययोजना करा. राज्यात आजही डेल्टाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 70 टक्के आहे. प्रत्येक जिह्यात हे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले नाही तसेच ज्यांच्यामध्ये सहव्याधी आहेत अशा लोकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी कोरोनाचा धोका हा पहिल्या लाटेप्रमाणेच गंभीर असून तिसऱ्या लाटेत हा धोका मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तिसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार आहे. अशा वेळी 80 लाखांची रुग्णसंख्या धरली तरी 1 टक्का मृत्युदराप्रमाणे 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तवली आहे.

जर कारोना रुग्ण लक्षणविरहित असेल तर त्याला घरच्या घरी विलगीकरणात राहण्याची परवानगी द्या. z ओमायक्रोन संसर्गाचा वेग पाहता असा रुग्ण घरी जाऊ नये किंवा समाजात मिसळू नये यासाठी काटेकोरपणे लक्ष द्या. z कोरोनासंदर्भातील कॉल सेंटर्स सुरू करा. त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करा. ऑक्सिजन सॅच्युरेशन, 6 मिनिटांची चालण्याची चाचणी यांचेही मार्गदर्शन या कॉलसेंटरवरून व्हायला हवेत. तसेच रुग्णाला ऍडमिट होण्यासाठी कोरोना रुग्णांची माहिती पुरवण्याबरोबरच ही कॉल सेंटर ऍम्ब्युलन्स नेटवर्कसोबत जोडा.