
दहीहंडी साजरी करण्यासाठी गर्दी जमवून कोरोनाला खतपाणी घालू नका असे आवाहन करीत शासनाने लागू केलेल्या नियमांची पायमल्ली करीत जाणीवपूर्वक जमाव जमविल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत आठ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जमाव करणाऱयांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.शिवाय बंदी असतानाही मंदिर उघडल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याने दहीहंडी सण साध्यापणाने साजरा करा. गर्दी जमा करून कोरोना पसरविण्यास मदत करू नका असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आल्यानंतर राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्याबाबत काही निर्बंध लागू केले. शिवाय त्याबाबत नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले. मात्र असे असतानाही काही अतिउत्साही लोकांनी जाणीवपूर्वक नियम पायदळी तुडवले आणि जमाव जमवून दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी निर्बंधाचे नियम तोडणाऱयांविरोधात शहरातील काळाचौकी, वरळी, घाटकोपर, साकीनाका, दादर, भांडुप, पार्कसाईट, खेरवाडी अशा आठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188, 269 आणि 270 कलमान्वये गुन्हे दाखल केले. काळाचौकी आणि साकिनाका येथे पोलीस आणि जमावामध्ये तु तु मै मै झाली. पण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, बंदी असतानाही मंदिर उघडल्याप्रकरणी बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे.
























































