…तर कोरोनाचा उद्रेक वारंवार होण्याची भीती; संक्रमण रोखणे गरजेचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी यावर काही औषध मिळेपर्यंत किंवा याच्यासाठी लसनिर्मिती होईपर्यत वारंवार कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती लंडनच्या इम्पेरिएल महाविद्यालयाच्या कोविड -19 पथकाने संशोधनातून व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखणे हाच यावर प्रभावी उपाय असल्याचे अभ्यासातून त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाने संभाव्य धोका ओळखून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या संशोधनाचा अहवाल 16 मार्चला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कोरोना रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, रोगाचा फैलाव कमी झाल्यावर निर्बंध उठवून जनजीवन पूर्वपदावर आल्यावर पुन्हा गर्दी वाढल्यास याचा उद्रेक तीव्रतेने होण्याची भीती संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी औषधे किंवा प्रभावी लसनिमिर्ती होईपर्यंत हे चक्र सुरू राहण्याचा धोका आहे. लसनिर्मितीच्या प्रकियेला सुमारे 12 ते 18 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रत्येक देशाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

कोरोनाच धोका ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच संक्रमित व्यक्तींना विलगीकरणात ठेवणेही गरजेचे आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण होणे टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि संक्रमण रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद करणे आवश्यक आहे. या संशोधनासाठी अमेरिका आणि ब्रिटनमधील आकडेवारींचा दाखला देण्यात आला आहे. तसेच जगभराचील आकडेवारीचाही अभ्यास करण्यात आला आहे.

कोरोनाचा तरुणांना धोका नाही हा गैरसमज
कोरोनाचा धोका तरुणांना नाही, असे समजणे अयोग्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचे संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. मात्र, तरुणांना याचा धोका नाही, असे समजणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरूणांनी त्यांना काही होणार नाही असे समजू नये. कोरोनाचे संक्रमण टाळण्य़ासाठी त्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना तुम्हाला अनेक आठवडे अंथरुणाला खिळवू शकतो. तुम्ही आजारी नसलात तरी काळजी घ्या आणि इतरांना संक्रमित करून त्यांच्या मृत्यूला कारण ठरू नका, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी तरुणांना केले आहे.