
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी, फूल विक्रेते, मुंबईतील डबेवाले, सलून दुकानदार, टॅक्सीचालक, मासळी विक्रेते आदी छोटय़ा व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संचारबंदीचा फटका वरील घटकांना बसणार असल्याने सरकारने आपल्या पॅकेजमध्ये या घटकांचा समावेश करून त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोटय़ा व्यावसायिकांसाठी आपण पॅकेज जाहीर केले. त्याबद्दल काँग्रेसच्या वतीने आपले स्वागत आहे. मात्र या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार आहे, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.



























































