कोरोनाच्या भयातून मी निवृत्त होतेय! सिंधूच्या पोस्टला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ‘मी निवृत्त होतेय’ अशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. मात्र, आपण बॅडमिंटनमधून नव्हे, तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या सततच्या भयातून व नकारात्मकतेतून निवृत्त होत असल्याचा उलगडा फुलराणीने आपल्या पोस्टमध्ये खाली केला तेव्हा कुठे बॅडिमिंटन रसिकांचा जीव भांडय़ात पडला. कोरोनाच्या जनजागृतीसाठी सिंधूने वापरलेल्या ‘आय रिटायर्ड’ या संकल्पनेला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने सोशल मीडियावर तीन पानांची पोस्ट टाकताना पहिल्या पानावर ‘डेन्मार्क ओपन अखेरचा स्ट्रॉ होता. मी निवृत्ती घेतली आहे.’ असे मोठय़ा अक्षरात टाकल्याने हिंदुस्थानातच नव्हे, तर बॅडमिंटन जगतात खळबळ उडाली होती. मात्र, पुढच्या पानावर तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. बऱयाच दिवसांपासून मी मनात उठणाऱया वादळाबद्दल मनमोकळेपणान बोलायचा विचार करत होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कोरोनासारख्या परिस्थितीचा सामना करताना मी अडखळले, घाबरले. मात्र, या महामारीने माझे डोळे उघडले. प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी कोर्टवर आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतो; तसाच प्रयत्न मला कोरोनाला हरविण्यासाठी करायचा आहे, असे मनात आले. पण न दिसणाऱया विषाणूला मी कसं हरवू. अवघ्या जगाला त्याने वेठीस धरले आहे. घरात बसून अनेक महिने उलटले; पण बाहेर पडायचे म्हटल्यावर अजूनही स्वतःला प्रश्न विचारावा लागतो. याच नकारात्मक विचारांमुळे मी डेन्मार्क ओपनमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करू शकले नाही, असेही सिंधूने सांगितले.

अखेरच्या पानावर सिंधूने, आता मी सकारात्मक विचार करून कोरोनाच्या भयातून निवृत्त होण्याचे ठरविले आहे. मी या नकारात्मकता, सततचे भय आणि अनिश्चिततेच्या वातावरणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले.