Cricket World Cup 2023 – उद्यापासून क्रिकेटचा महासंग्राम!

अवघे क्रिकेट विश्व ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतेय, आता त्यांची प्रतीक्षा संपतेय. क्रिकेट वर्ल्ड कपचा महासंग्राम उद्यापासून सुरू होतोय. तब्बल 46 दिवस रंगणाऱया क्रिकेटच्या थराराविषयी 1983 च्या जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाचे निवड समिती अध्यक्ष चंदू बोर्डे आणि याच संघाचे सदस्य दिलीप वेंगसरकर यांचे भाष्य…

हिंदुस्थानी क्रिकेटचा स्तर कमालीचा उंचावलाय- चंदू बोर्डे

क्रिकेट हा खेळ पूर्वी फक्त शहरी भागापुरता मर्यादित असायचा. आता खेडय़ापाडय़ापर्यंत या खेळाने हातपाय पसरले आहेत. जिल्हास्तरावरही आता चांगल्या दर्जाची स्टेडियम्स उभी राहिली आहेत. पूर्वी क्रिकेटपटूंसाठी ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट, कोचेस आणि डॉक्टर या भानगडी नसायच्या. हेल्मेट, एल्बो गार्ड, चेस गार्ड या सुविधांचाही अभाव होता. क्रिकेटमधून खेळाडूला पैसाही मिळत नव्हता. त्यामुळे मुलांनी हातात बॅट धरलेली आई-वडिलांना आवडत नसे. आता मात्र या खेळाला लक्ष्मीचा वरदहस्त लाभला आहे.

केवळ रणजी स्पर्धेतूनही क्रिकेटपटूंना वर्षाकाठी कमीत-कमी चार ते पाच लाख रुपये सहजपणे मिळू शकतात. शिवाय सर्व सुविधाही त्यांच्या दिमतीला असल्याने आता पालकच क्रिकेटसाठी मुलांचा हुरूप वाढवीत आहेत. परिणामी क्रिकेटचा स्तर निश्चितच उंचावला असून या खेळाला हिंदुस्थानात आता चांगले दिवस आले आहेत.

1983च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी मी संघनिवड समितीवर होतो. त्या वेळी हिंदुस्थानला लिंबू-टिंबू संघ समजले जायचे. मात्र त्या वेळी अधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्याची आमची योजना फायदेशीर ठरली. याच अष्टपैलू खेळाडूंनी हिंदुस्थानला जगज्जेते बनवून इतिहास घडविला होता.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011मध्ये हिंदुस्थानी उपखंडात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने बाजी मारून 28 वर्षांपासून जगज्जेते पदाचा दुष्काळ संपविला. धोनीच्या संघात रथी-महारथी खेळाडूंचा भरणा होता. त्यात धोनीसह युवराज सिंग, हरभजन सिंग व वीरेंद्र सेहवाग असे अष्टपैलू खेळाडू होते. त्यामुळे हिंदुस्थानला वर्ल्ड कप जिंकता आला.

2019चा इंग्लंडमध्ये झालेला वर्ल्ड कपसुद्धा आपलाच होता. या स्पर्धेतही टीम इंडियाने अतिशय काwतुकास्पद कामगिरी केली. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीने आपला घात केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील तत्कालीन संघातही अष्टपैलू खेळाडूंचा भरणा होता. उपांत्य सामना जिंकलो असतो, तर कदाचित त्या वेळचे जगज्जेतेही आपण असतो. मात्र एकदिवसीय क्रिकेटमधील निकाल त्या दिवसाच्या कामगिरीवर अवलंबून असतो. याचाच फटका आपल्याला 2019च्या वर्ल्ड कपमध्ये बसला.

तुम्हाला सांगतो, या वेळीदेखील यजमान हिंदुस्थानलाच जगज्जेते होण्याची सर्वाधिक संधी आहे. घरचे मैदान, वातावरणाचा फायदा, प्रेक्षकांचा पाठिंबा… सर्व काही या वेळी हिंदुस्थानच्या बाजूने असणार आहे. हिंदुस्थानची बाकावरील फळीदेखील खूप बलाढय़ आहे. संघातील जागेसाठीची खेळाडूंमधील चढाओढ नक्कीच संघाच्या फायद्याची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एक परिपूर्ण संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये काwशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झालाय. फलंदाजी, गोलंदाजी, फिटनेस अशा सर्वच आघाडय़ांवर हिंदुस्थानला थोडी नशिबाची साथ मिळाली ना तर यंदाचा वर्ल्ड कप आपलाच असेल़

शब्दांकन -विठ्ठल देवकाते

हिंदुस्थान हॉट आणि सर्वात फेव्हरिट- दिलीप वेंगसरकर

एकीकडे आपण ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला लोळवलेय. दुसरीकडे आपले सर्व खेळाडू फॉर्मात आहेत. आपण वन डेच्या नंबर वन सिंहासनावर विराजमान आहोत. त्यातच आपण घरच्या मैदानावर-खेळपट्टय़ांवर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहोत. त्यामुळे वर्ल्ड कपचा सर्वात हॉट आणि फेव्हरिट संघ हिंदुस्थानशिवाय दुसरा कुणी असूच शकत नाही. हिंदुस्थाननेच तिसऱयांदा जगज्जेते व्हावे, ही सर्वसामान्य हिंदुस्थानींप्रमाणे माझीही मनापासून इच्छा आहे.

उद्यापासून हिंदुस्थानात क्रिकेटचा महासंग्राम सुरू होणार असून यात दहा संघ आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेत. पुढचा दीड महिना अवघा हिंदुस्थान क्रिकेटमय होईल. यात सारेच न्हाऊन निघणार आहेत. यंदाचा वर्ल्ड कप नक्कीच भव्य आणि दिव्य असेल. आतापर्यंतचे सर्वोत्तम आयोजन करण्यासाठी जसे बीसीसीआय झटत आहेत तसेच टीम इंडियाही या वर्ल्ड कपला सर्वोत्तम करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तयार झालीय. पावसामुळे आपले दोन्ही सराव सामने वाहून गेले. त्यामुळे आपल्याला सराव करायला मिळाला नाही. मुळात आपला संघ गेले तीन महिने इतका जोरदार सराव करतोय आणि वर्ल्ड कपची इतकी जबरदस्त तयारी केलीय की, आता कोणताही पेपर त्यांना कठीण जाणार नाही. ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवताना आपण ते दाखवून दिलेय.

मला हिंदुस्थानच्या कामगिराची जराही चिंता नाही, मात्र मला भीती सतावतेय ती पावसाची. जे आशिया कपमध्ये घडले ते हिंदुस्थानात घडू नये, पावसाने आता परतीची वाट धरावी. गेले काही वर्षे आपल्या इथे दिवाळीतही पावसाने फटाके आणि पंदील ओले केले आहेत. त्यामुळे त्याने आता आमच्यावर थोडी कृपा करावी, अशी कळकळीची विनंती आहे.

शब्दांकन -मगेश वरवडेकर

चौथ्या संघाबाबत अनिश्चितता

वर्ल्ड कप कोण जिंकणार हा सर्वांना प्रश्न पडलाय. सर्वांची आपापली उत्तरेही ठरलीत. तसेच माझेही मन बोलतेय, हिंदुस्थानच जिंकावा. पण न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघही ताकदीचे आहेत. हे तिघे उपांत्य फेरीत नक्कीच धडकतील. मात्र चौथा संघ म्हणून पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी कुणीही असू शकतो. चौथ्या संघाबाबत माझ्या मनात अनिश्चितता आहे.

अनेक खेळाडू डेंजरस

 टी-20 ने क्रिकेटला अनेक डेंजरस खेळाडू दिलेत. त्यामुळे कुणाची बॅट कधी तळपेल, कुणाचे चेंडू कधी वळतील हे निश्चित सांगता येत नाही. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीवर सर्वांचे लक्ष असेलच, पण मुळात क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो एकटय़ाच्या जिवावर कधीच खेळता येत नाही, खेळला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक मॅचला वेगवेगळा विनर असेल. तो विराटही असू शकतो नाहीतर अश्विनही. ज्याचा दिवस तोच डेंजरस असेल.