
सामना प्रतिनिधी । केज
केज तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकरी हैराण झाला आहे. घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण आणि फरफट सुरू आहे. शेतीला जोडधंदा व नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या होत्या. दुभती जनावरे घेतली होती. मात्र, सततच्या दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पिण्यासाठी पाणी नाही तर फळबाग कशी जगवायची अशी समस्या शेतकऱ्यांसमोर होती. पाण्याअभावी शेकडो एकरावरील डाळिंब व आंब्याच्या बागा करपून गेल्या. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना बागा उपटून टाकाव्या लागल्या आहेत.
केज तालुक्यात सर्वात जास्त क्षेत्रात उंदरी येथे डाळिंब बागा आहेत. त्याचबरोबर सारणी (आ.), सारणी सांगवी, जवळबन, येथे डाळिंब बागा आहेत, आंब्याच्या बागाही मोठ्या प्रमाणात आहेत परंतू यापैकी बहुतांशी बागांना दुष्काळाच्या झळा बसल्या असून त्या वाळून गेल्या आहेत. करपलेल्या बागाच्या नोंदी प्रशासन घेत नाही. नोंदी लावण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक पैसे मागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चारा पाणी नसल्यामुळे जवळचे पशुधन कवडीमोल किंमतीत बाजारात खाटीकांना विकले आहेत. केज तालुका हा ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. सध्या सर्व कारखाने बंद झाल्यामुळे अनेक मजूर परत गावी आलेले आहेत. त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मजूर, शेतकरी यांच्या हाताला काम नाही. शासनाची दुष्काळ योजना सध्या सुरू नाही, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे अनेक मजूर स्थलांतर करू लागले आहेत. तालुक्यात उद्योग धंदे नाहीत, पुढारी हे करतो ते करतो अशा गप्पा मारून नेहमीप्रमाणे वेळ मारून नेत आहेत. जनावरे छावणीत पाठवण्यात आली असून त्यांनाही चारा वेळेवर मिळत नाही. 45 अंश तापमानात फक्त हिरव्या जाळ्यामध्ये जनावरे बांधली जात आहेत. अनेक जनावरे उष्माघाताचे बळी पडत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर त्याचे जनावरे हाकलून देण्यात येत आहेत. सक्तीने विजबील वसुली सुरू आहे. बिले थकल्यावर लगेच वीज तोडली जात आहे.
























































