
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड स्थानकांदरम्यान नवीन दैनंदिन एक्स्प्रेस गाडी प्रवासी सेवेत धावणार आहे. या गाडीला गुरुवारी दुपारी सीएसएमटी येथे हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून थेट सावंतवाडीपर्यंत गाडी सुरू करण्यासाठी शिवसेनेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला मोठे यश आल्यामुळे कोकणवासीयांचे थेट गाडीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या पुढे मडगावपर्यंत जातात. त्यामुळे कोकणच्या प्रवाशांना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सीएसएमटी ते सावंतवाडी दैनंदिन गाडी सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली होती. तसेच रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आणि रेल्वेकडून सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसला मंजुरी देण्यात आली. या गाडीच्या शुभारंभाचा कार्यक्रम गुरुवारी सीएसएमटी येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य-उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे या दैनंदिन एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
-
उद्घाटनपर विशेष गाडी सीएसएमटी येथून दुपारी १२.५० वाजता सुटेल आणि ती गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
-
ही गाडी पुढील दोन-तीन दिवसांतच प्रत्यक्ष प्रवासी सेवेत धावणार आहे. गाडीच्या नियमित सेवेची तारीख आणि अधिकृत वेळ नंतर जाहीर केली जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण मार्गी लावा!
शिवसेनेची मागणी मान्य करून सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाचे शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी स्वागत केले. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या आणखी वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण मार्गी लावले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवश्यक तेथे बोगद्यांची कामे पूर्ण करून दुपदरीकरण लवकरात लवकर केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार सावंत यांनी दिली.



























































