पँथरचा झंझावात संपला,ज्येष्ठ विचारवंत लेखक राजा ढाले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळकळीचे नेते- विचारवंत, बंडखोर लेखक राजा ढाले यांचे मंगळवारी  सकाळी विक्रोळी येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दीक्षा आणि कन्या गाथा असा परिवार आहे. ढाले यांच्या निधनाने दलित आणि आंबेडकरी विचार चळवळीला मोठा धक्का बसला असून चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’

 

राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांची कन्या गाथा यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यांच्या निधनावर सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

आंबेडकरी चळवळीतील अतिशय हरहुन्नरी नेतृत्व अशी राजा ढाले यांची ओळख होती. चळवळीचे भाष्यकार, बौद्ध साहित्याचे अभ्यासक, परखड विचार, आक्रमकता अशा रूपांत ते महाराष्ट्राला परिचित होते.

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे. त्यांच्या जाण्याने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे- रामदास आठवले, अध्यक्ष रिपाइं

राजा ढाले नेता होते, मार्गदर्शक होते. मी संपादित केलेल्या ‘अस्तित्वाच्या रेषा’ या त्यांच्या पुस्तकात या पैलूंचा आढावा घेतला आहे. पँथरनंतर दिशाहीन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आता त्यांच्या जाण्याने चळवळ खऱया अर्थाने दिशाहीन झाली आहे- ज. वि. पवार, दलित पँथरचे संस्थापक सदस्य

ढाले हे समतेसाठीच्या चळकळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्काचे पर्व आहे-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

साहित्य, संस्कृती व कला यांना संघर्षाचे सौंदर्य लेणे प्रदान करण्याचे त्यांचे कार्य अतुलनीय  होते. अन्यायांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आम्ही गमावून बसलो- प्रा. जोगेंद्र कवाडे, अध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी

ते कवी, वाचक, संपादक, लेखक होते. पुस्तकाचा त्यांचा मोठा संग्रह होता. तर्कशास्त्रावर त्यांची मोठी पकड होती. एखाद्या गोष्टीचा तर्कवाद करताना समोरच्याला ते निप्रभ करत. लोकांच्या प्रश्नावर लढाई करणारा हा माणूस होता- अविनाश महातेकर, राज्यमंत्री