नुसत्याच पोकळ घोषणा! होऊ दे चर्चा कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडत चालले आहे. सत्ताधाऱ्यांकडून ना महागाई कमी केली जात ना रोजगार उपलब्ध केला जात. नुसतीच भंपकबाजी केली जातेय, अशाने रयत सुखी होत नाही. चरितार्थ चालवण्यासाठी लोकांच्या हाताला काम मिळायला हवे आहे. रोजगार उपलब्ध केला जायला हवा आहे. मात्र या सर्वच बाबतीत सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांना फक्त पक्ष फोडाफोडीचे राजकारण चांगले जमते असे हे सत्ताधारी लोक रयतेचा विकास करू शकत नाहीत. हे आता सर्वांना समजून चुकले आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. सर्वसामान्यांचेच काय तर सर्वांचेच जीणं हराम करणाऱ्यांना जनता त्यांची जागा निवडणुकीत दाखवून देईल अशाप्रकारचा घणाघात करत सरकारच्या योजनांची माजी आमदार संजय कदम यांनी पोलखोलच केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दापोली तालुक्यातील जालगाव पंचायत समिती गणातील वळणे गावी होऊ द्या चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या काय्रक्रमाला माजी आमदार संजय कदम, माजी सभापती चंद्रकांत बैकर, माजी सभापती शांताराम पवार, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर,तालुका सचिव नरेंद्र करमरकर, जालगाव विभागप्रमुख शैलेश पांगत, जालगाव विभाग सचिव विकास पवार, उपविभाग प्रमुख सुनील जागडे, निगडे शाखाप्रमुख दिनेश रेवाळे, उंबर्ले शाखाप्रमुख प्रमोद जाधव, बूथ प्रमुख रामचंद्र काष्टे, शिर्दे गावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात संजय कदम, चंद्रकांत बैकर यांनी केंद्र सरकारच्या मागील 10 वर्षातील फसव्या योजनांचा पर्दाफाश करून मोदी सरकारवर सडकून टीका केली. या कार्यक्रमाला मोठ्याा प्रमाणात महिला व जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन वळणे शाखेने केले होते.