
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे जूनअखेरीस आपल्या ३७ वर्षांच्या आयपीएस सेवेनंतर निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेले मुंबईचे दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे, तर पडसलगीकर यांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ४१वे पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांना संधी मिळणार आहे.
येत्या ऑगस्टअखेरीस दत्ता पडसलगीकर हेही सेवाज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त होणार आहेत, परंतु पडसलगीकर यांनी गेली ३६ वर्षे केलेली निष्कलंक सेवा व मुंबईची वाहिलेली यशस्वी धुरा पाहता या प्रामाणिक अधिकाऱयाला राज्य व केंद्र शासन ऑगस्टनंतर सहा महिने मुदतवाढ देणार आहे असे सांगण्यात येते. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबईचे आयुक्तपद व पोलीस महासंचालकपद रिक्त होणार असल्याने ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परमवीर सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी फेब्रुवारी महिन्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे तर राज्याचे महासंचालक म्हणून अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱया संजय बर्वे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संजय बर्वे हेही पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.
संजय बर्वे यांनाही ज्येष्ठ असलेले सुबोध जयस्वाल हे सध्या केंद्रीय सेवेत गुप्तचर विभागात (प्रतिनियुक्तीवर) कार्यरत असून ते पुन्हा महाराष्ट्रात परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे संजय बर्वे यांचा मुंबईचा आयुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱयावर असून पंतप्रधानांचा दौरा संपल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहेत. उपायुक्तांसह ज्येष्ठ अधिकाऱयांच्या रखडलेल्या बदल्या मार्गी लागणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
























































