
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांना, अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात पडू नका. नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असे धमकावणाऱया दाऊदच्या हस्तकास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने कोलकाता येथे धाड घालून नुकतीच अटक केली असून उद्या त्याला मुंबईच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त विक्रम देशमाने व विनयकुमार राठोड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
पलाश नरेंद्रनाथ बोस (49) असे या दाऊदच्या हस्तकाचे नाव असून तो विज्ञान शाखेचा पदवीधर व जिम ट्रेनर आहे. आपल्या शिक्षक असलेल्या पत्नी व दोन मुलांसह कोलकाता येथे राहणाऱया या दाऊदच्या हस्तकाने प्रथम शिवसेना नेते संजय राऊत यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात व्हॉटस्ऍप मेसेज व व्हॉइस कॉल करून धमकावण्यास सुरुवात केली होती. सुशांतसिंह प्रकरणात तुम्ही पडू नका. मी दाऊदचा माणूस आहे. नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असे बोलून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती.
एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी याची गंभीर दखल घेऊन तपास जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्याकडे सोपविला. हा तपास सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही निवासस्थानी व कार्यालयात दाऊदच्या नावाने धमक्या देण्यात आल्या. याचीही गंभीर दखल देवेन भारती यांनी घेऊन दया नायक व त्यांच्या सहकाऱयांना सखोल तपासाचे आदेश दिले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्या देणारी व्यक्ती ही एकच असल्याचे आढळून आले. एसीपी श्रीपाद काळे, दया नायक, दशरथ विटकर, सचिन पाटील, सागर कुंजीर, सचिन पुराणिक, कंक या पथकाने पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईक नवरे, उपायुक्त विक्रम देशमाने व विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथे धाड घालून पलाश बोस यास काल अटक केली.
पलाश बोस हा 1999 साली दुबईला गेला होता व दोन वर्षांपूर्वी तो पुन्हा कोलकाता येथील आपल्या घरी परतला होता. यादरम्यान त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आले होते. त्यामुळे यापूर्वी त्याने आणखी कुणाकुणाला धमक्या दिल्या होत्या याचा एटीएसचे तपास अधिकारी दया नायक व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. त्याच्याकडून तीन सीम कार्डस्ही जप्त करण्यात आली आहेत.




























































