
खार पश्चिमेकडील ओम पॅलेस या इमारतीत गुपचूप सुरू असलेला उच्चभ्रू लोकांचा जुगार अड्डा गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून पोलिसांनी 34 लाखांची रोकड, एक कोटी एक लाख 50 हजार किमतीचे जुगार खेळण्यासाठी लागणारे कॉईन्स जप्त करण्यात आले. तसेच 12 महिला व 33 पुरुष अशा 45 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
खारमधल्या ओम पॅलेस या उच्चभ्रू लोकांच्या इमारतीमधील एका संपूर्ण मजल्यावर गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे जुगार खेळवला जात असल्याची माहिती युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दीपक पवार, सपोनि महेंद्र पाटील व पथकाने शुक्रवारी रात्री त्या इमारतीमधील जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे 38 जण जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. हा जुगार अड्डा चार भागीदार मिळवून चालवत होते. तसेच तेथे तीन वेगवेगळय़ा टेबलांवर जुगार खेळला जात होता.
38 जण ताब्यात
कारवाईत जुगार चालविणारे चार भागीदार, तीन जॉकी, प्रत्यक्ष जुगार खेळणारे 38 जण अशा एकूण 45 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात 12 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास युनिट-9 करीत आहे. ज्या सदनिकेत जुगार अड्डा सुरू होता तो फरार आहे.




























































