सिझन बॉल लागून खेळाडूचा मृत्यू; माटुंगा येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुसऱया खेळपट्टीवरील फलंदाजाने मारलेला चेंडू डोक्याला लागून खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना माटुंग्याच्या मेजर रमेश दडकर मैदानात घडली. जयेश सावला असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

कच्छी समाजाच्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन माटुंग्याच्या दडकर मैदानात केले होते. त्या मैदानात दुसऱया संघाचे क्रिकेटचे सामने खेळवले जात होते. सावला हे भाईंदर येथील संघातून सामना खेळत होते. सामन्यादरम्यान सावला हे क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा दुसऱया खेळपट्टीवर खेळत असलेल्या फलंदाजाने चेंडू मारला. तो चेंडू सावला यांच्या डोक्याला लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर सावला यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सावला यांना तपासून मृत घोषित केले.