
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
देशात अनेक काँग्रेसी नेते पक्षाला ‘हात’ दाखवत असताना हरयाणात माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’चा चंग बांधलेला दिसत आहे. अर्थात काँग्रेसी परंपरेप्रमाणे हुड्डा यांच्या या घरवापसी कार्यक्रमात खोडा घालण्याचे महत्कार्य काँग्रेसचेच नेतेमंडळी करीत आहेत. त्यामुळे हरयाणात काँग्रेसची घरवापसी होणार की अंतर्गत हेवेदावे आणि राजकीय हाणामाऱया यातून भाजपचे फावणार हे यथावकाश कळेलच. कांग्रेसच्या घरवापसीचे उचललेले शिवधनुष्य सोपे नाही याची जाणीव हुड्डा यांना झालीही असेल. राज्यसभा निवडणूक ही हरयाणाच्या राजकारणाला टार्ंनग पॉइंट देणारी ठरणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत ‘एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आणतो’ असा शब्द हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी हायकमांडला दिला आहे. त्याच भरवशावर हायकमांडने त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून नेमले आहे. मात्र प्रदेशाध्यक्षपदाची संधी हुकल्यामुळे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव कुलदीप बिश्नोई पक्षावर नाराज आहेत. ते कोणत्याही स्थितीत गळती हंगामात आपली ‘नाराजीची मोळी’ टाकून मोकळे होतील, असे बोलले जात आहे. बिश्नोई यांनी भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची नुकतीच भेटही घेतली आहे. काँग्रेसची राज्यसभेची स्थिती अगदी काठावर आहे (31 मते). यापैकी एखाददुसरे मत जरी इकडे तिकडे झाले तरी काँग्रेसला दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे कांग्रेसच्या घरवापसीचे उचललेले शिवधनुष्य सोपे नाही याची हुड्डांना एव्हाना जाणीव झालीही असेल. राज्यसभा निवडणूक ही हरयाणाच्या राजकारणाला टार्ंनग पॉइंट देणारी ठरणार आहे. देशभरातील राजकारणाला आयाराम गयाराम हे नामाभिधान देणारे काँग्रेसी नेते गयाराम यांचे चिरंजीव उदयभान हे सध्या हरयाणात कांग्रेसचे अध्यक्ष आहेत. भूपिंदरसिंग हुड्डा उदयभान यांच्या मदतीने सात वर्षांपूर्वी काँग्रेसने गमावलेली सत्ता मिळविण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. दिल्लीतील खुशमस्कऱया नेत्यांच्या सांगण्यावरून हायकमांडने हुड्डा यांना अडगळीत टाकले होते. त्याचे पर्यवसान असे झाले की, काँग्रेसची अवस्था अगदीच दोलायमान झाली. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या हरयाणात काँग्रेस विकलांग झाली याचे भान उशिरा का होईना, हायकमांडला आल्यानंतर तातडीने फेरबदल करून हुड्डांकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्यापरीने पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रदेशाध्यक्षपद न मिळालेल्या कुलदीप बिश्नोई व रणदीप सुरजेवाला यांनी हुड्डांच्या मेहनतीवर पाणी ओतण्याचे काम कांग्रेसी परंपरेनुसार इमानेइतबारे सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेसची घरवापसी सत्तेच्या उंबरठय़ाजवळ येऊन थांबते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या हरयाणात सुरू आहे. तसे झाले तर तो सगळ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का असेल. त्यामुळे आता ‘वेकअप कॉल’प्रमाणे सगळेच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. हुड्डा यांनीही त्यासाठी श्रीगणेशा केला आहे. मात्र कुलदीप बिश्नोई यांनी कांग्रेसला ‘गुड बाय’ केला तर तो पक्षासाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे राज्यसभेचे गणित तर बिघडलेच, शिवाय बिगर प्रस्थापितांचा मोठा वर्ग काँग्रेसपासून दुरावण्याची शक्यता आहे.
केवळ मतांसाठी ‘गोमाता की जय…’
‘गोमातेचे रक्षक’ केवळ आम्हीच आहोत हे दाखविण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नसतात. मात्र या भक्त मंडळींच्या विचारांच्या सरकारलाच माता गोमातेची किती फिकीर आहे, हे नुकतेच स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना केली होती. आता तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही या आयोगाला कोणी अध्यक्ष द्यावा असे मोदी सरकारला अजूनही वाटलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोरक्षणाचा एक अजेंडा आहे. या अजेंडय़ाच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. किंबहुना अजेंडय़ामुळे का हाईना, नाइलाजाने पहिली पाच वर्षे टंगळमंगळ केल्यावर मोदी सरकारला 2019 मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेची घोषणा करावी लागली. मात्र आता सत्ताधाऱयांचे गोमाता प्रेम किती ढोंगी, बोगस आणि मतांसाठी आहे हे स्पष्ट झाले आहे. निवडणुका आल्या की, गोमातेला गोंजारून गोग्रास खाऊ घालणे आणि गोमूत्राने भलेबुरे आजार बरे होतात अशा कंडय़ा पसरवणे हीच भाजपच्या मंडळींची गोसेवा असावी बहुधा! अच्छे दिनपासून ते न्यू इंडियापर्यंतची अनेक आश्वासने मोदी सरकारने जनतेला दिली. मात्र त्यातले एकही आश्वासन फलद्रूप झालेले नाही. आता साक्षात गोमातेलाही फसविण्याचा प्रकार घडला आहे.
सिब्बल यांची ‘सायकल’वारी
राज्यसभेसाठी ‘जी-23’च्या असंतुष्ट मंडळींचा जीव घायकुतीला आलेला असताना कोणालाही ताकास तूर लागू न देता विद्वान वकील कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या सायकलवर टांग मारत कांग्रेसला ‘हात’ दाखविला. काँग्रेसच्या पक्ष संघटनेत बदल करावा, नेतृत्वाने कार्यशैलीत बदल करावा यासाठी 23 असंतुष्ट नेत्यांचा गट दिल्लीत जमला. त्यांनी पत्राचार केला. या पत्राचाराचा मसुदा ज्यांनी तयार केला ते डोकेबाज कपिल सिब्बल त्यामुळे हायकमांडच्याही रडारवर होते. सिब्बल हे विख्यात कायदेतज्ञ आहेत. मात्र ते कधीच मास लीडर नव्हते. एकदा चांदनी चौकातून लोकसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रीही बनले, पण कायदेपंडित म्हणूनच ते अधिक लोकप्रिय ठरले. गुलाम नबी आझाद व आनंद शर्मांसारखे नेते राज्यसभेकडे आशाळभूतपणे पाहत असताना कांग्रेसमध्ये आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या सायकलवर सवारी करीत राज्यसभेकडे कूच केले आहे. आझम खान यांना वेगवेगळय़ा खटल्यातून वाचविण्याची पुण्याई सिब्बल यांच्या कामी आली आहे. ‘आमच्याकडून राज्यसभेवर जा’, असे सिब्बल यांच्याकडे लालू यादव व हेमंत सोरेन यांचेही प्रस्ताव होते म्हणे. कपिल सिब्बल हे आजच्या युगातील नशीबवान म्हणायला हवेत.





























































