दिल्ली डायरी – मध्य प्रदेशातली राजकीय धुळवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी 

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचा बहुमताचा आकडा हा ट्वेंटी-20 क्रिकेटच्या  ‘सुपर ओव्हर’प्रमाणे उत्कंठावर्धक पद्धतीने इकडे तिकडे सरकताना दिसत आहे. भाजपने कमलनाथ सरकार उलथून टाकले तर त्याचा मोठा संदेश देशभर जाणार आहे. इंदिरा गांधी व संजय गांधींच्या तालमीत तयार झालेले कमलनाथ जर भाजपच्या सर्वशक्तिमान सत्ताधीशांना पुरून उरले तर त्याचाही मोठा परिणाम देशाच्या राजकारणावर होईल. ‘बुरा न मानो होली है’ असे म्हणत मध्य प्रदेशातील जनतादेखील ही राजकीय धुळवड एन्जॉय करीत आहे.

मध्य प्रदेशात भाजप आणि काँगेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांत सध्या राजकीय धुळवड जोरात साजरी केली जात आहे. जनमताचा कौल मिळाला नाही तर जबरदस्तीने तो मिळवा, असाच समज सध्या भाजप नेतृत्वाचा झाला आहे. दिल्लीतील पराभव भाजपच्या भलताच जिव्हारी लागला आहे. त्याचे परसेप्शन असेच राहू नये आणि दिल्लीतील ‘पराभवाचा व्हायरस पसरू नये म्हणून भाजप नेतृत्वाने मध्य प्रदेशसारख्या तुलनेने शांत राज्यांत सत्तेचा सारीपाट मांडला आहे. मध्य प्रदेशातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजप धुरिणांनी तब्बल सहा तास दिल्लीत खलबते केली. सत्तेसाठी भाजपने चालविलेली ही धडपड केविलवाणी आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही धडपड सुरू आहे. दर तासाला दोन-चार आमदार इकडे तर दोन-चार आमदार तिकडे असा पळवापळवीचा प्रयोग विंध्याचलच्या भूमीत सुरू आहे. राज्यसभेतले संख्याबळ वाढविण्याबरोबरच मध्य प्रदेशात कमळ फुलविण्याचा भाजप नेत्यांचा मनोदय आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी अशा अनेक  ऑपरेशन्सचा सर्वाधिक अनुभव असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि त्यांचे चिरंजीव विजयेंद्र पुढे सरसावले आहेत. राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी दिग्विजय सिंग यांनी आपल्याच मित्राचे सरकार पणाला लावल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे, तर दुसरीकडे या सगळ्या नाटय़ाचे सूत्रधार ज्योतिरादित्य शिंदे असल्याचे बोलले जात आहे. कारणे काहीही असोत, जनता रोज जीवनमरणाच्या प्रश्नांशी झगडत असताना मध्य प्रदेशमध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून होत असलेले सत्तेचे वस्त्रहरण हे उबग आणणारे आहे. गेली सवा वर्षे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांची खुर्ची वाचवली खरी, मात्र आता ती डगमगायला लागली आहे. स्वकीय आणि विरोधक दोन्ही बाजूंकडून कमलनाथ यांना पराभवाचा रंग फासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारणातले अर्क असणारे कमलनाथ या धुळवडीतून सहिसलामत बाहेर पडतात का, हे काही दिवसांतच समजेल.

mulayam-amarमुलायम, अमरसिंह अन् आझम खान

राजकारणातली सत्ता म्हणजे अळवावरचे पाणी! उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याची इथली जुनीपुराणी रीत. ‘जिकडे गुलाल तिकडे खोबरे’ म्हणणाऱ्यांची राजकारणात कमी नाही. त्यामुळेच ‘सुख के सब साथी दुःख मे ना कोय’ याचा प्रत्यय सध्या मुलायमसिंह, अमरसिंह आणि आझम खान हे देशातील दिग्गज राजकारणी घेत आहेत. याच त्रिकुटाने एकेकाळी उत्तर प्रदेशवर एकहाती एकदिलाने सत्ता गाजवली. त्यात सध्या वैद्यकीय उपचार घेणाऱ्या अमरसिंह यांचाही वाटा होताच. अर्थात आता त्यांनीही रुग्णालयातून मोलाचा संदेश दिला आहे. तो राजकारणासह इतर क्षेत्रांतही काम करणाऱ्यांसाठी तंतोतंत लागू पडतो. ‘माणसाच्या आयुष्यात सत्तेचा भरभराटीचा काळ फार थोडा असतो. अशा वेळी तुमच्याभोवती प्रसिद्धी, पैसा, वलय, सेलिब्रिटी, कार्यकर्ते, नोकरचाकर या सर्वांचा राबता असतो. काळ पुढे सरकला आणि तुम्ही सत्तेबाहेर गेला की, तुमची साधी विचारपूसही कोणी करत नाही. आज मी रुग्णशय्येवर पडलो आहे, पण माझी विचारपूस करण्यासाठीही कोणाकडे वेळ नाही. हेच जीवनाचे सत्य आहे.’ एकेकाळी दिल्लीच्या राजकारणातले ‘चाणक्य’ म्हणवून घेणाऱ्या आणि बॉलीवूडमध्ये मोठा प्रभाव असणारे अमरसिंह यांची ही करुण कहाणी. दुसरीकडे मुलायमसिंह म्हणजेच नेताजी संसदेत येणार म्हटले की, समाजवादी पार्टीच्या खासदारांची त्यांच्या स्वागतासाठी रांग लागलेली असायची. हल्ली मुलायम हे व्हीलचेअरने संसदेत येतात. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी असतात ते केवळ त्यांचे कार्यालयीन सचिव रमाकांत पांडे. दिग्गज नेते असलेले मुलायमही आयुष्याच्या सायंकाळी अशा विदारक अनुभवाला तोंड देत आहेत. दुसरीकडे कधीकाळी उत्तर प्रदेशात दहशत असलेल्या आझम खान यांना सहकुटुंब तुरुंगाची वारी करावी लागली आहे. तुरुंगातल्या डासांनी आझम खान यांना वेदना समजावून सांगितल्या आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच येत नाही हा धडा यातून प्रत्येकानेच घेतलेला बरा.

बेताल बडबड सुरूच!

पंतप्रधानांनी समजावूनही भाजप नेत्यांची बेताल बडबड काही कमी होताना दिसत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत वादग्रस्त विधान करूनही अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मांवर कारवाई न झाल्याने आता तर काही भाजप नेत्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावलेला असावा. याचे कारण म्हणजे ज्या व्हायरसमुळे अवघे जग भयभीत झाले आहे अशा कोरोनालाच भाजपचे नेते दंड थोपटून आव्हान देत आहेत. होमहवनामुळे कोरोना पळून जाईल, असा दावा राघवेंद्र नावाच्या भाजप आमदाराने केला आहे तर प्रेम सागर पटेल नावाच्या आणखी एका आमदाराने तुरटीच्या मदतीने कोरोना पळून जाईल, असे ‘संशोधन’ केले आहे. आसामचे आमदार सुमन हरिप्रिया यांनी गोमूत्र आणि शेणामुळे कोरोना पळून जाईल असा शोध लावला आहे. भाजपच्या आणखी एका आमदाराने तर माझ्या मतदारसंघात कोरोनाने घुसूनच दाखवावे, असे ओपन चॅलेंज दिले आहे. या आमदाराचा आवेश लक्षात घेता कोरोना विषाणू बहुदा खरोखरच पळ काढेल! ‘नॉन इश्यूचा इश्यू’ आणि ‘इश्यूचा नॉन इश्यू’ करण्याची भाजपच्या नेत्यांना शिकवणी दिली असावी. कारण पंतप्रधानांनी दटावल्यानंतरही भाजप नेते वादग्रस्त वक्तव्यांचा कोरोना पसरवतच आहेत.

[email protected]