रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी विशेष विभाग स्थापन करा!- केंद्र सरकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभरात अनेक राज्यांमध्ये यंदा दुष्काळाने डोके वर काढले. पावसाने ओढ दिली तर भूजलपातळीही खालावली. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने कंबर कसली आहे. सध्या अनेक भागात चांगला पाऊस कोसळत आहे. परंतु, हे पाणी समुद्राला जाऊन वाया जाऊ नये म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी विशेष विभाग स्थापन करण्याचे आदेश केंद्र सरकारने देशातल्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाने पाणीबचतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार संबंधित शहरातील पाणीसाठे पूनरूज्जीवीत करण्याच्या दृष्टीने आणि भूजल पातळीकडे विशेष लक्ष देण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने देशातल्या सर्व महापालिका आणि नगरपालिकांना आदेश दिले आहेत.दरम्यान, पाणीबचत करण्याबाबत किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा राबवण्याबाबत संबंधित शहरातील विशेष विभाग जबाबदार असेल असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पाणी वाचवण्याचा संदेश देणार
पाणी वाचवण्याचा संदेश घराघरांत जावा यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे. जल शक्ती अभियानाचाच हा एक भाग असून 1 जुलै ते 15 सप्टेंबरदरम्यान पाणीबचतीबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. तर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान दुसऱया टप्प्यात जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.

रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल तर बांधकामांना ओसी
मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिकांनी आपापल्या शहरात इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल तरच ओसी द्यावी. तसेच संबंधित इमारतींमध्ये अशाप्रकारची यंत्रणा राबवण्यात येत आहे की नाही हे तपासून पाहावे असे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.